आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:डिलिव्हरी ॲपचा वापर करून एलएसडी अमली पदार्थाची विक्री; उच्चशिक्षित तरुणांकडून 51 लाखांचा एलएसडीसाठा जप्त

पुणे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डनजो ऑनलाईन डिलिव्हरी ॲपचा वापर करून एलएसडी अमली पदार्थाची विक्री केली जात असल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत उघडकीस आला आहे.

यामुळे अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांनी आता ऑनलाईन विक्री सुरू केली असून अमली पदार्थाची घरपोहोच ऑनलाईन डिलिव्हरी केली जात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी ऑनलाईन डिलिव्हरी ॲपद्वारे अमली पदार्थांची खरेदी विक्री करणाऱ्यांना अटक केली आहे.सदर कारवाईत सुमारे 51 लाख 60 हजार रुपयांचे एलएसडी अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

धीरज दीपक ललवाणी (वय 24), दीपक लक्ष्मण गेहलोत (वय 25),रोहन दीपक गवई (वय 24), सुशांत काशिनाथ गायकवाड (वय 26) आणि ओमकार रमेश पाटील (वय 25,सर्व रा.पुणे) या आरोपींना संबंधित प्रकरणात पुण्यातील बाणेर सिंहगड रोड पिंपळे सौदागर वाकड परिसरातून शोध घेऊन अटक करण्यात आलेली आहे.

अमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलीस कर्मचारी विशाल शिंदे यांना पुणे शहरात ऑनलाईन डिलिव्हरी अँप द्वारे एलएसडी या अमली पदार्थाची खरेदी -विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी करून सुरुवातीला रोहन गवळी या आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल 90 हजार रुपये किमतीचे 30 मिलिग्रॅम एलएसडी आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्यानंतर त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत इतर साथीदारांची नावे निष्पन्न झाली. त्यांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले.

एकूण पाच आरोपीकडून पोलिसांनी 51 लाख 35 हजार रुपये किमतीचे एल एस डी या अमली पदार्थाचे 17 ग्रॅम वजनाचे 1032 तुकडे जप्त केले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर या करत आहेत.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक एकचे विनायक गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर,विशाल शिंदे, मनोज कुमार साळुंखे, पांडुरंग पवार, राहुल जोशी, रेहाना शेख, योगेश मोहिते , मारुती पारधी, सुजित वाडेकर ,ज्ञानेश्वर घोरपडे, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी ,संदीप शिर्के ,संदेश काकडे ,नितेश जाधव ,सचिन माळवे यांच्या पथकाने केली आहे.