आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री चंद्रकांत पाटील यांना 'सन्मति दे भगवान' प्रार्थना:राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन, शाईफेक प्रकरणात पत्रकाराला अटक केल्याचा निषेध

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाईफेकीच्या घटनेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराला अटक केल्यामुळे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मूक निदर्शने करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांना 'सन्मति दे' प्रार्थना यावेळी करण्यात आली.

जंगली महाराज रस्त्यावर झाशीची राणी पुतळा चौकात हे आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते. यावेळी महात्मा गांधी यांची रघुपति राघव राजाराम, सबको सन्मति दे भगवान ही पर्थना करीत चंद्रकांत पाटील यांना सन्मति मिळो, अशी प्रार्थना करण्यात आली.

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून संस्था उभ्या केल्या, असे अवमानकारक वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यामुळे समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवड येथे पाटील यांच्यावर तोंडावर काळी शाई फेकली. या घटनेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकार गोविंद वाकडे यांना नेमका व्हिडिओ कसा मिळाला. त्यांची चौकशी करावी, अशी मागणी पाटील यांनी केली होती. त्यामुळे पोलिसांनी वाकडे यांना ताब्यात घेतले. याविरुद्ध संताप व्यक्त झाल्यावर त्यांना पोलिसांनी सोडले.

राज्याच्या एका मंत्र्याने पोलिसांवर दबाव आणल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला. पत्रकारावर दडपशाही करून आपल्या विरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भाजपच्या या फासिस्ट विचारांमुळे पुढील काळात पत्रकारांना निरपेक्ष वार्तांकन करतानाही दबाव सहन करावा लागेल. पत्रकारांना बळ देऊन लोकशाहीच्या चौथ्या खांबाचे स्वातंत्र्य अबाधित रहावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कायम प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास आंदोलनातून दिल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. याप्रसंगी अंकुश काकडे , प्रदीप देशमुख रवींद्र माळवदकर, बंडू तांबे , कार्तीक साठे , नीता कुलकर्णी , शंटीसिंग राजपाल, बाळासाहेब आहेर , मनिषा होले, राजू साने , शिल्पा भोसले व कार्यकर्ते मोठया संख्याने उपस्थित होते.

शैक्षणिक साहित्य पाठवून आंदोलन

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांच्याबाबतीत केलेल्या चूकीच्या विधानाचा निषेध आम आदमी पार्टीतर्फे व्यक्त करण्यात आला. आपच्या महिला कार्यकर्त्यांनी डेक्कन पोस्ट ऑफिस येथून पाटील यांना शैक्षणिक साहित्य पाठविले. तसेच पाटील यांच्या ज्ञानात भर पडावी, त्यांना इतिहास कळावा यासाठी पुस्तके घेण्यासाठी भिक मागून जमा केलेले पैसे देखील पोस्टाद्वारे मनीऑर्डर करुन पाठवण्यात आल्याचे आपच्या महिला बचतगट शहर संघटक सिमा गुट्टे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...