आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध शास्त्रीय गायक, संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य, प्रसिद्ध शास्त्रीय गायक व संगीतकार पंडित हेमंत पेंडसे यांच्या षष्ठ्यब्दिपूर्तीनिमित्त रविवार, 25 डिसेंबर 2022 रोजी शिष्य परिवारातर्फे त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पंडित हेमंत पेंडसे षष्ठ्यब्दिपूर्ती सोहळा समितीचे अध्यक्ष अनिल पटवर्धन आणि राधिका ताम्हनकर यांनी सोमवारी येथे दिली. या वेळी पुष्कर देशपांडे उपस्थित होते.
सत्कार सोहळ्यानिमित्त पंडित शौनक अभिषेकी, विदुषी अपर्णा गुरव आणि युवा गायिका राधिका ताम्हनकर यांच्या मैफलीचे आयोजनही करण्यात आले आहे. षष्ठ्यब्दिपूर्ती सोहळा आणि संगीत मैफल टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी 6 वाजता होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
षष्ठ्यब्दिपूर्तीनिमित्त पंडित हेमंत पेंडसे यांचा सत्कार सुप्रसिद्ध ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित सुहास व्यास यांच्या हस्ते होणार असून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध गायक डॉ. विकास कशाळकर आणि पंडित शौनक अभिषेकी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
पंडित हेमंत पेंडसे हे अभिषेकीबुवांचे ज्येष्ठ शिष्य आहेत. गायक, संगीतकार आणि गुरू म्हणून त्यांना संगीत क्षेत्रात मानाचे स्थान आहे. या क्षेत्रातील त्यांचे मोलाचे योगदान समाजापर्यंत पोहोचावे या उद्देशाने त्यांच्या शिष्य वर्गाने या विशेष सांगीतिक सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंडित हेमंत पेंडसे यांच्या संगीत रचनांची झलक, मित्रपरिवार व कलाकारांनी व्यक्त केलेले मनोगत दृक्श्राव्य माध्यमातून दाखविण्यात येणार आहे, असे पटवर्धन आणि ताम्हनकर यांनी सांगितले.
शास्त्रीय गायन मैफलीत पंडित मंगेश मुळ्ये, सुयोग कुंडलकर, मिलिंद गुरव, अभिजित बारटक्के, स्वानंद कुलकर्णी, उद्धव गोळे, आदित्य आपटे साथसंगत करणार असून कार्यक्रमाचे निवेदन रवींद्र खरे करणार आहेत.
कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.