आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे:माझ्याविरोधात तक्रार करणाऱ्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठाेकणार - संजय काकडे

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुन्ह्याची चौकशी केली जावी : संजय काकडे

माझे मेहुणे उद्योजक युवराज ढमाले यांनी मला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यासंदर्भात अद्यापपर्यंत पोलिसांनी मला कळवलेले नाही. ढमालेने माझ्यावर केलेल्या आरोपांबाबत मला बोलावून अथवा माझा जबाब न घेता व कोणतीही शहानिशा न करता एकतर्फी हा गुन्हा दाखल केला आहे. हे राजकीय षड‌्यंत्र आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर कुणाचा दबाव होता, यासह या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व जनतेसमोर सर्व सत्य यावे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, पुणे शहर पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांना निवेदन देणार आहे. तसेच या आरोपांमुळे मानहानी झाली असून, संबंधितांवर मानहानी झाल्याचा व १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, अशी माहिती माजी खासदार संजय काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काकडे म्हणाले, माझा प्रत्यक्ष जबाब नोंदवून घेऊन कायदेशीरपणे गुन्हा नोंदवायला हवा होता. कारण ढमालेने तीन वर्षांपूर्वी मी त्याला दम दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. इतक्या वर्षांपूर्वी झालेल्या घटनेबाबत कुणी तक्रार देत असेल तर पोलिसांनी त्याविषयी खात्री करून पुढील कारवाई करणे अपेक्षित होते. चतु:शृंगी पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हा नोंदवण्यापूर्वी आरोपांची साधी खात्रीदेखील करावीशी वाटली नाही. पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्यासाठी कुणाचे फोन आले? कुणी त्यांच्यावर दबाव आणला? याविषयी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी एखादा विशेष तपास अधिकारी नियुक्त करून चौकशी करावी. यामध्ये ढमालेचे तक्रार दाखल केल्याच्या संपूर्ण दोन दिवस अगोदर व पोलिस स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्याचे दोन तास अगोदर व नंतरचे फोन कॉल रेकॉर्ड तपासले जावे, असेही काकडे यांनी सांगितले.