आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटक - महाराष्ट्र सीमावादावर कर्नाटकातून प्रतिक्रीया उमटत असताना महाराष्ट्रातही आता त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. कोल्हापूर, पुणे शहरात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. महाराष्ट्राच्या 5 गाड्या फोडल्या तर कर्नाटकच्या 50 गाड्या फोडू असा इशारा कोल्हापुरातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आज दिला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला आहे. बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर केलेल्या हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहेत.
संजय पवारांसह कार्यकर्ते ताब्यात
महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावर आज कोल्हापुरात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटक सरकारविरोधात ठाकरे गटाकडून निषेध तसेच घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान कोल्हापुरातील आंदोलन उग्र होताना पाहुन पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. यावेळी आंदोलक ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, यात जिल्हाप्रमुख संजय पवार यांचाही समावेश आहे.
सरकारने दंगा घडवून आणला
आंदोलनावेळी ताब्यात घेतल्यानंतर संजय पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, कोल्हापुरातील हजारो महिला कर्नाटकात गेल्या, त्यांचे संरक्षण करा. आमच्या पाच गाड्या फोडल्या तर पन्नास गाड्या फोडणार. सरकारपुरस्कृत दंगा सीमावादात होत आहे. आमच्या वाहनांना सुरक्षा दिल्या नाही तर आम्ही शांत बसणार नाही. षडयंत्र रचून सरकारने दंगा घडवून आणला आहे.
पुण्यातही आंदोलन
सीमावादावर पुण्यात आज ठाकरे गटाचे आंदोलन झाले. महाराष्ट्रातील वाहनांवर होणारे हल्ले आणि सीमावासीयांची मुस्कटदाबी केली जात असल्यावरुन हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटकच्या बोम्मई सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
बसेसना काळे फासले
पुण्यात शिवसेना (बाळासाहेब उद्धव ठाकरे) कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसेसना काळे फासले आहे. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सात कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
म्हणून पडसाद
बेळगावात मंगळवारी सकाळी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले चढवले. बऱ्याच वाहनांची तोडफोड केली. बेळगावातील या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. पुण्यात कर्नाटकच्या चार बसेसना काळे फासले आहे. स्वारगेट येथील लक्ष्मी नारायण चौकात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या या बसना कार्यकर्त्यांनी काळे फासून बेळगावच्या घटनेचा निषेध नोंदवला.
शरद पवारांची प्रतिक्रीया
पवार म्हणाले, आज महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांवर जे हल्ले झाले, त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. महाराष्ट्र संयम बाळगत आहे. अजूनही बाळगेल. परंतु संयमालाही मर्यादा असतात. येत्या चोवीस तासात महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांवरील हल्ले थांबले नाही, तर त्या संयमाला वेगळी किनार मिळेल व त्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि कर्नाटक सरकार त्यासाठी जबाबदार राहील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.