आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे पोलिसांना मोठे यश:सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयित संतोष जाधवला​​​​ गुजरातमधून अटक

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
संतोष जाधवला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयिताला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुजरातमधून अटक केली आहे. संतोष जाधव असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. रविवारी रात्री उशिरा त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्याला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी त्याचा साथीदार सौरभ ऊर्फ सिध्देश ऊर्फ महाकाल हिरामण कांबळे याला संगमनेरमधून अटक केली होती.

पंजाबमध्ये 29 मे रोजी मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केली होती. या खून प्रकरणात पंजाब, राजस्थानमधील लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिसांनी आठ संशयित हल्लेखोरांबद्दल माहिती काढून तपासाला गती दिली. त्यामध्ये मंचरमधील सराईत संतोष जाधव आणि त्याचा साथीदार सौरभ महाकाळ यांचा संशयित आरोपींचा समावेश होता.

खूनानंतर फरार

पुर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगार संतोष जाधव याने साथिदारांसह मिळून ओंकार ऊर्फ राण्या बाणखेले याच्यावर पिस्तूलातून गोळ्या झाडून खून केल्याची घटना ऑगस्ट 2021 मध्ये घडली होती. त्यानंतर तो फरार झाला होता. दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी संतोष जाधव याला गुजरातमधून अटक केली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, यांच्या पथकाने केली.

खुनाची आधीच माहिती होती

सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयित संतोष जाधव आणि सौरभ महाकाल यांना मुसेवाला खुनाची आधीच महिती होती आणि दोघे लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात होते, अशी बाब समोर आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक कुलदीप सरांगल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, संतोष जाधव याने पोलिसांना मिळून येऊ नये यासाठी आपल्या डोक्यावरील पूर्ण केस काढून स्वतःचा पेहराव बदलला होता, अशी माहिती त्यांनी दिली. मुसेवाला प्रकरणात दोघांचा नेमका काय सहभाग होता, याबाबत माहिती घेत असल्याचे सरांगल यांनी सांगितले.

महाकालच्या माहितीवरून सुगावा

संतोष जाधव याच्यासोबत रेकॉर्डवरील गुन्हेगार नवनाथ सूर्यवंशी यासही अटक करण्यात आली आहे. यापूर्वी अटक केलेल्या महाकालने दिलेल्या माहितीवरून जाधव याचा सुगावा लागला, अशी माहिती पोलिसांनी दिली. बिश्नोई टोळीत आरोपी कसे सहभागी झाले. त्यांच्या संपर्कात राज्यातील इतर कोण व्यक्ती आहे, याबाबत माहिती गोळा करण्यात येत आहे. बिश्नोई टोळी पाच ते सहा राज्यात कार्यरत आहे.

भुजमधून घेतले ताब्यात

पंजाबी प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात संशयित आणि पुणे जिल्ह्यातील मंचर येथील ओंकार बाणखेले खून प्रकरणातील आरोपी सौरभ महाकाल पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरुवातीला संगमनेर येथून अटक केली आहे. त्याच्या चौकशीदरम्यान त्याचा साथीदार संतोष जाधव याचा ठावठिकाणाबाबत माहिती मिळविण्यात येत होती. जाधव याच्या तपासासाठी गुजरात, पंजाब, राजस्थान आणि दिल्ली मध्ये शोधपथके गेली होती. दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संतोष जाधव गुजरातमध्ये भुज जिल्ह्यात नगौर येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुजरात मध्ये तपासासाठी गेलेल्या पथकाने संतोष जाधव याचा ठावठिकाणा घेत त्यास जेरबंद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...