आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासैन्य दलात भरती करण्याच्या अमिषाने फसवणूक केल्याचा वॉटस्अप स्टेटस ठेऊन तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना कराड तालुक्यातील कोळे गावात घडली.
प्राप्त माहीतीनुसार, दयानंद बाबुराव काळे असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून सैन्य दलात जवान असलेला त्याचा चुलत भाऊ प्रदीप विठ्ठल काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मृताचा भाऊ शिवानंद बाबुराव काळे यांनी कराड ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. - चुलत भाऊ प्रदीप विठ्ठल काळे हा सैन्य दलात भरती झाला आहे. त्याच्याप्रमाणे आपला लहान भाऊ दयानंद हा देखील भरतीसाठी प्रयत्न करत होता. प्रदीप याने मला फोन करून दयानंदला सैन्य दलात भरती करतो, असे सांगितले. दीड लाख रुपये द्या. पंधरा दिवसात सैन्य दलात भरती झाल्याचे नियुक्तीपत्र येईल, असे सांगून पैशाची मागणी केली. त्यानुसार वेळोवेळी रोख तसेच ऑनलाईन 9 लाख रूपये दिले.
पावसाळा संपला की दयानंदला ट्रेनिंगला बोलवतील, असे प्रदीप काळे याने फिर्यादीला सांगितले. काही दिवसानंतर प्रदीप हा वास्तुशांतीसाठी सुट्टीवर गावी आला होता. त्यावेळी शिवानंद व त्याच्या वडिलांनी प्रदीपला दयानंदच्या भरतीबाबत विचारणा केली असता थोडे दिवस थांबा. माझे वरिष्ठांशी बोलणे झाले आहे, अशी थातुरमातूर कारणे सांगून त्याने वेळ मारून नेली.
भरतीला विलंब होत असल्याचे पाहून दयानंदने प्रदीपला फोन करून ट्रेनिंगला कधी जायचे आहे ते सांग नाहीतर मला माझे पैसे परत दे, असा निर्वाणीचा इशारा दिला. तरी देखील थोडे दिवस थांबा. तुझे काम होईल, अशी उत्तरे तो देत होता.
पैसे देऊनही भरतीचे काम होत नसल्याने दयानंदची चिडचिड वाढली. तो तणावात होता. कुटुंबीयांनी प्रदीपकडे पैसे परत देण्याचा तगादा लावला. दयानंदने प्रदीपला फोन केला असता तू मला दिलेल्या शिव्या ऐकून आमच्या अधिकार्यांनी तुझी फाईल फाडली, असे प्रदीपने सांगितले. तसेच 2 लाख 90 हजार रुपयांचा चेक दिला. नंतर नोकरी आणि उर्वरीत पैशाबाबत प्रदीप विषय टाळू लागला. त्या तणावामुळे दयानंदने खाणे पिणे सोडले.
फसवणूक झाल्याने दयानंद तणावात गेला. सतत रडायचा. माझी फसवणूक झाली. मला आता जगू वाटत नाही, असे म्हणायचा. कुटुंबीय त्याची समजूत काढत होते. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. दयानंदने शिवारातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
कुटुंबीयांनी त्याचा मोबाईल पाहिला असता प्रदीप काळे याने भरती करतो म्हणून घरच्यांकडून नऊ लाख रुपये घेऊन मला फसविले आहे. संपूर्ण पुरावा माझ्या मोबाईलमध्ये आहे. गावातील काही मुलांना देखील असेच अमिष दाखवले आहे. मी टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण प्रदीप आहे, असा स्टेटस ठेवला होता. याप्रकरणी पोलिसांनी प्रदीप काळे याला ताब्यात घेतले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.