आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजच्या तरुण पिढीला बेजबाबदार म्हटले जाते. मात्र, या पिढीपेक्षा जबाबदार आणि सजग मला कोणीही वाटत नाही. तरुणाईकडे बघूनच मी जिवंत आहे, असे उद्गार अभिनेते नाना पाटेकर यांनी काढले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, नाम फाउंडेशन, शिवम प्रतिष्ठान, निर्मला गजानन फाउंडेशन आणि प्रादेशिक रक्तपेढी ससून रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान महाअभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरुवात सोमवारी विद्यापीठातील क्रीडा संकुल येथे पाटेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई आदी उपस्थित होते.
नाना पाटेकर म्हणाले, कोविडचा हा काळ कठीण काळ असून प्रत्येकाने आपापल्या परीने आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी. या वेळी रक्तदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रेही देण्यात आली. सोमवारी झालेल्या या एकदिवसीय शिबिरात दुपारी दोन वाजेपर्यंत सव्वाशे विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. अशा प्रकारचे शिबिर प्रत्येक महाविद्यालयात घ्यावे, अशा सूचना महाविद्यालयांना विद्यापीठाकडून करण्यात आल्या आहेत.
सावित्रीबाईंचा वारसा विद्यापीठ पुढे चालवत आहे : डॉ. नितीन करमळकर
सावित्रीबाई फुले यांचे प्लेगच्या साथीतील कार्य आपणास ज्ञात आहे, तोच वसा आपण पुढे घेऊन जात आहोत. कोविडच्या काळात रक्ताचा तुटवडा असताना सामाजिक जाणिवेतून विद्यापीठ आपला खारीचा वाटा देण्याचा प्रयत्न करत असल्याचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले. दरम्यान, या वेळी इतर मान्यवरांचे देखील भाषणे झाली. त्यांनीही मोलाचे मार्गदर्शन या वेळी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.