आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजयपूर घराण्याच्या युवा गायिका यशस्वी सरपोतदार यांच्या तयारीच्या गायनाने सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या पहिले सत्र रंगतदार ठरले. यशस्वी यांनी राग बिहाग मध्ये 'कजरारे प्यारे तोरे नैना' ही मध्यलय त्रितालातील रचना पेश केली.
द्रुत तीन तालात 'पियु पल न लगत मोरी अखियां' ही पारंपरिक बंदिश सादर केली. त्यानंतर 'पटदीप' रागात 'पिया नही आये' ही बंदिश गायली. द्रूत एकतालातील त्यांनी सादर केलेला तराणाही दाद मिळवून गेला. रसिकांच्या आग्रहाखातर यशस्वी यांनी 'रंग डारूंगी नंद के लालनपे' ही होरी नजाकतीने पेश केली.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित 68 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या चौथ्या दिवसाची सुरुवात जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका पद्मा तळवलकर यांच्या शिष्या असलेल्या यशस्वी सरपोतदार यांच्या गायनाने झाली. त्यांना मिलिंद कुलकर्णी ( हार्मोनियम) आणि पं. रामदास पळसुले ( तबला ), राधा आणि मयुरी ( तानपुरा ) यांनी साथ केली.
'भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीच्या या वर्षात मला महोत्सवात प्रथमच माझी संगीत सेवा करण्याचे अर्पण करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजते, असे म्हणत यशस्वी यांनी भीमसेन जोशी यांना अभिवादन केले.
सवाई गंधर्व संगीत महोत्सवात शनिवारी पुढील सत्रांत धृपद गायक उमाकांत गुंदेचा आणि अनंत गुंदेचा यांचे सहगायन होईल. आग्रा घराण्याच्या बंगळूरू स्थित भारती प्रताप यानंतर आपली गायन कला सादर करतील. यानंतर पं. भीमसेन जोशी यांचे नातू व श्रीनिवास जोशी यांचे सुपुत्र व शिष्य विराज जोशी हे आपली गायनसेवा रुजू करतील.
सुप्रसिद्ध गायक, संगीतकार सिड श्रीराम यांचे कर्नाटक शास्त्रीय गायन आणि त्यानंतर चौथ्या दिवसाच्या शेवटी होणाऱ्या उस्ताद रशीद खाँ आणि उस्ताद शाहीद परवेज यांची जुगलबंदी चौथ्या दिवशीचे वैशिष्ट्य असेल. आपल्या ख्याल गायकीसाठी प्रसिद्ध असलेले उस्ताद रशीद खाँ हे रामपूर- सहसवान घराण्याचे ज्येष्ठ कलाकार असून उस्ताद शाहीद परवेज हे इमदादखानी घराण्याचे जगप्रसिद्ध सतारवादक आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.