आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचढत्या संध्याकाळच्या वातावरणात गायिका मनाली बोस यांनी सादर केलेला राग मारवा आणि संतूरवादक राहुल शर्मा यांच्या वादनातून झंकारलेला हंसध्वनी, ही सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या सत्राच्या पूर्वार्धाची आकर्षणे ठरली.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात कोलकातास्थित किराणा घराण्याच्या गायिका मनाली बोस यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मारवामध्ये एकतालातील निलंबित बंदिशीतेन हळूवार सादरीकरणाने आपल्या गायनाची सुरवात केली.
'गुरूबिन ग्यान मत पावे' ही बंदिश त्यांनी मारवा या सायंकालीन रागाद्वारा मांडली. त्यानंतर 'अब काहे सतावो जावो...' हा गारा व पिलू रागातील मिश्र दादरा मनाली बोस यांनी ढंगदारपणे सादर केला. पंडित भीमसेन जोशी यांच्या तसेच लता मंगेशकर यांच्या स्वरांनी अजरामर झालेले लोकप्रिय भजन ' बाजे रे मुरलिया बाजे' त्यांनी सादर केले. त्यांना अभिनय रवांदे (हार्मोनियम ), पांडुरंग पवार (तबला), वीरेश संकाजे व वत्सल कपाळे ( तानपुरा) यांनी अतिशय समर्पक साथ केली.
महोत्सवात युवा पिढीचे लोकप्रिय संतूरवादक राहुल शर्मा यांनी राग हंसध्वनी पेश केला. संतूर या काश्मीरमधील लोकसंगीतातील नाजुक वाद्याला अभिजात संगीताच्या व्यासपीठावर मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या पं. शिवकुमार शर्मा यांचे राहुल हे पुत्र आणि शिष्यही. त्यांनी कलेचे संस्कार पिताजींकडून घेतले आणि नव्या काळाला अनुसरून संतूरवादनात अनेक प्रयोगही केले आहेत. याची प्रचिती त्यांच्या वादनातून रसिकांना मिळाली.
ओजस अडिया यांची पूरक तबलासाथ उल्लेखनीय ठरली. राहुल यांनी हंसध्वनी मध्ये आलाप, जोड, झाला या क्रमाने वादन करत रंग भरले. नऊ मात्रांच्या मत्त तालात एक रचना आणि तीनतालातील धून सादर करून त्यांनी रसिकांची दाद मिळवली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.