आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित 68 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवादरम्यान होणाऱ्या षड्ज, अंतरंग आणि ‘शताब्दी स्मरण’ या चित्रप्रदर्शनाची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
येत्या 14 ते 18 डिसेंबर दरम्यान 68 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आयोजन मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल या ठिकाणी होणार असून याच दरम्यान शिवाजीनगर येथील राहुल थिएटर शेजारी असणा-या सवाई गंधर्व स्मारक या ठिकाणी दि. 14, 15 व 16 डिसेंबर दरम्यान सकाळी 11 ते 1 या वेळेत षड्ज व अंतरंग हे कार्यक्रम पार पडतील. शिवाय महोत्सवादरम्यान दरवर्षी आयोजित करण्यात येणारे ‘शताब्दी स्मरण’ हे चित्रप्रदर्शन देखील या वेळी वैशिष्ट्यपूर्ण असेल, अशी माहिती श्रीनिवास जोशी यांनी दिली.
पं. जसराज यांची मुलगी दुर्गा जसराज आणि त्यांचे भाचे व शिष्य पं. रतन मोहन शर्मा हे पं. जसराजांच्या आठवणींना उजाळा देतील. पं. भीमसेन जोशी यांच्या सांगीतिक जीवनावर आधारित चित्रपटाचे प्रदर्शन दुसऱ्या दिवशी करण्यात येईल. या चित्रपटाची निर्मिती आर्य संगीत प्रसारक मंडळाने केली आहे. सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ यांचे सुपुत्र आलम खाँ यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम होईल.
प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर म्हणाले, “भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने संपन्न होणाऱ्या या वर्षीच्या महोत्सवात दर वर्षीप्रमाणे प्रकाशचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यावर्षी हे प्रदर्शन पं. भीमसेन जोशी यांच्या प्रकाशचित्रांवर आधारित असेल. प्रकाशचित्रात टिपला गेलेला प्रत्येक क्षण आपल्याला पुन्हा तो क्षण जगण्याचा आनंद देतो. प्रकाशचित्राचे हे सामर्थ्य या प्रदर्शनातून पुन्हा एकदा रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.”
दिवंगत ज्येष्ठ प्रकाशचित्रकार अनिल देशपांडे व सुधाकर जोशी तसेच सतीश पाकणीकर यांच्या संग्रहातील अनेक प्रकाशचित्रातून आपल्याला यावर्षी देखील काळाच्या पडद्याआड गेलेली मैफल परत एकदा अनुभवायला मिळणार आहे. महोत्सवाचे मुख्य आयोजक पं. भीमसेनजी व आपली कला सादर करायला येणारे भारतभरातील कलाकार यांच्यातील स्नेहाचे, एकमेकांच्या कलांना दाद देतानाचे, सत्काराचे, आदराचे, प्रेमाचे संबंध किती अकृत्रिम आणि अत्यंत साधेपणाचे होते हे या प्रदर्शनात पाहता येईल. पं. भीमसेनजी व अन्य कलाकार यांच्या प्रकाशचित्रांबरोबरच पाकणीकरांच्या कॅमेऱ्याने टिपलेल्या ‘भीमसेनी मुद्रा’ ही या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण असेल. गेली तेरा वर्षे वेगवेगळ्या थीमवर पाकणीकर यांनी महोत्सवात प्रदर्शने सादर केली आहेत, प्रदर्शनाचे हे चौदावे वर्ष आहे अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.
----
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.