आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिराणा घराण्याची सुरेल गायकी आणि बहारदार सरोदवादनाचा आनंद लुटत रसिकांनी 'सवाई 'मध्ये संगीतमय संध्याकाळ अनुभवली. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात किराणा घराण्याचे गायक अविनाश कुमार यांच्या गायनाने झाली.
अविनाश कुमार यांनी राग पुरीया धनाश्रीद्वारे सादरीकरणास सुरूवात केली. त्यामध्ये विलंबित एकताल बंदिश, त्यानंतर द्रुत तीन तालातील 'पायलिया झंकार मोरी' आणि एकतालातील बंदिश सादर केली. संत कबीर यांची रचना असलेल्या 'मन मन फूला फूला फिरे जगत में' या भजन सादरीकरणाने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला.
अविनाश कुमार यांनी यंदा प्रथमच सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात आपली कला सादर केली. यावेळी बोलताना कुमार म्हणाले, "तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट घडते, तेव्हा एखादे स्वप्न पूर्ण झाल्याप्रमाणे वाटते. आज सवाई'च्या मंचावर आपली कला सादर करताना मलाही माझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे.
त्यानंतर मैहर घराण्याचे सुप्रसिद्ध सरोदवादक आलम खाँ यांचे सरोदवादन झाले. त्यांनी आपले वडील महान सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मैहर सेनी घराण्यातील हिंडोल-हेम या मिश्र रागातील रचना सादर केल्या. सुरवातीला रागाची उकल करत, द्रुत गत सादरीकरणाद्वारे रसिकांची मने जिंकली.
राग मिश्र पिलूमध्ये रूपक तालातील गत सादर करत त्यांनी आपल्या वादनाची सांगता केली. त्यांना सत्यजित तळवलकर त्यांना तबल्याची साथ केली.
कार्यक्रमात आलम खाँ यांचे वडील उस्ताद अली अकबर खाँ आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या आठवणींना उजाळा देत श्रीनिवास जोशी म्हणाले, " माझे वडील आणि उस्तादजी यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. या दोघांमधील समान दुवा म्हणजे दोघांनाही गाडी चालवण्याची प्रचंड आवड होती. त्यांच्याप्रमाणे पुढील पुढील पिढीतही हा जिव्हाळा कायम राहील, असा मला विश्वास आहे."
आलम खाँ म्हणाले, " कोविडनंतर हे माझे पहिलेच सादरीकरण आहे. या ठिकाणी माझी कला सादर करणे हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे. यापुढील काळात भारतात आणखी काही कार्यक्रम सादर करण्यासाठी पुन्हा येण्याची संधी मिळेल, अशी मला खात्री आहे."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.