आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील उत्तुंग योगदान आणि सामाजिक कार्य लक्षात घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार समितीच्या वतीने 'समर्पण पुरस्कार' देण्याचे ठरवण्यात आले आहे. यंदाचा पहिला समर्पण पुरस्कार सामजिक बांधिलकी असलेले सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार समितीचे राजेश पांडे, बाळासाहेब जानराव, ॲड. मंदार जोशी, सुनील महाजन, मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
पुरस्काराविषयी माहिती देताना आयोजकांनी सांगितले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या एका वर्गापुरते मर्यादित नव्हते. त्यांचे कामगार, महिला, सामाजिक, कायदा, शैक्षणिक आदी क्षेत्रातील योगदान बहुमूल्य आहे. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विविध क्षेत्रातील व्यक्तींना समर्पण पुरस्काराने सन्मानित करण्याचा आमचा मानस आहे. यंदाचा पहिला समर्पण पुरस्कार संवेदनशील अभिनेते सयाजी शिंदे यांना देण्यात येणार आहे. सह्याद्री देवराई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सयाजी शिंदे पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत.
सह्याद्री देवराई सामाजिक संस्था देशी वृक्षांची लागवड, संगोपन व संरक्षण करून निसर्ग संवर्धनाचे कार्य करत आहे. महाराष्ट्रातील १३ हून अधिक जिल्ह्यांमध्ये सह्याद्री देवराईचे काम सुरू असून आतापर्यंत ४० हून अधिक देवराई आणि १ जैव-विविधता उद्यान नव्याने विकसित केले आहे. साताऱ्याच्या म्हसवे गावात १०० एकरमध्ये हे जैव-विविधता उद्यान पसरलेले आहे. येथे १ वृक्ष बँक तसेच बियाणाद्वारे ७० हजारांहून अधिक देशी रोपे विकसित केली आहेत. वृक्षारोपणासह झाडांचे पुनर्रोपण हा सह्याद्री देवराई संस्थेचा एक प्रमुख उपक्रम आहे. मे २०२२ मध्ये जिंतुर-जालना महामार्ग रस्ता रुंदीकरणाच्या कामात ४०० हून अधिक झाडे या संस्थेने वाचवली. तर औरंगाबाद महामार्गावरील ५१ हेरिटेज वटवृक्षांचे जतन करण्याचे काम सध्या सह्याद्री देवराई मार्फत सुरू आहे.
या पुरस्काराचे वितरण २३ एप्रिल २०२३ रोजी लेडी रमाबाई हॉल, स. प. महाविद्यालय येथे सायंकाळी ५ वा. होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असणार आहेत. याशिवाय सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अन्य मान्यवरही याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत असे आयोजकांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.