आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:संत तुकोबांचा बीज सोहळा ५० भाविकांच्या उपस्थितीत; प्रशासनाचे प्रतिबंधात्मक आदेश

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांची माहिती

संत तुकाराम महाराज यांचा परंपरागत वैकुंठगमन सोहळा यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या पन्नास भाविकांच्या उपस्थितीत ३० मार्च रोजी पार पडणार आहे. यासंदर्भातील शासकीय आदेश श्री तुकाराम महाराज संस्थान समितीला नुकतेच प्राप्त झाले आहेत, अशी माहिती संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर मोरे यांनी दिली. वारकरी संप्रदायाच्या परंपरेत तुकोबांचा वैकुंठगमन सोहळा हा बीज सोहळा किंवा तुकाराम बीज या संज्ञेने ओळखला जातो. दरवर्षी बीज सोहळा अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लक्षावधी भाविक श्रीक्षेत्र देहू येथे येतात.

हजारो भाविक बीज तिथीच्या आधी येऊन गाथेचे पारायण करतात. गेल्या वर्षी बीज सोहळा अकरा मार्च रोजी पार पडला आणि नंतर लाॅकडाऊन जाहीर झाला. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने शासकीय आदेशानुसार निवडक पन्नास भाविकांच्या उपस्थितीत ३० मार्च रोजी बीज सोहळा पार पडणार आहे, असे मधुकर मोरे यांनी स्पष्ट केले. भाविकांनी यंदा आपापल्या घरीच राहून तुकोबांचा बीज सोहळा गाथेचे पारायण करून साजरा करावा. कुणीही देहू येथे येऊ नये, असे आवाहन देहू संस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

५० व्यक्तींची कोरोना चाचणी होणार
बीज सोहळ्यात सहभागी होणाऱ्या निवडक पन्नास व्यक्तींमध्ये संस्थानचे विश्वस्त आणि काही मानकरी यांचा समावेश आहे. त्यांची यादी पोलिस प्रशासनाला देण्यात येणार आहे. तसेच या पन्नास व्यक्तींची कोरोना चाचणी केली जाणार आहे. सोहळा पारंपरिक पद्धतीने पण निवडक मंडळींच्या उपस्थितीत पार पाडला जाणार आहे. प्रशासनाच्या वतीने इन्सिडंट कमांडर म्हणून प्रांताधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार गीता गायकवाड आणि मधुसूदन बर्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

असा होईल बीज सोहळा
-३० मार्च रोजी पहाटे तीन वाजता विश्वस्तांच्या उपस्थितीत महापूजा
-पहाटे चार ते सहा काकडा
-त्यापूर्वी २४ मार्चपासून हरिकथा सप्ताह
-सहा ते दहा - मंदिरातील नित्योपचार
-दहा ते बारा - देहूकरांचे कीर्तन
-बारा ते एक - प्रत्यक्ष बीज सोहळा
-त्यानंतर महाप्रसाद दर्शनबारी यंदा नसेल

बातम्या आणखी आहेत...