आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धांजली:ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर कालवश; 55 वर्षांपूर्वी कोयनानगरातील बॅडमिंटन कोर्टवर आम्ही साक्षात नंदू नाटेकर यांच्याकडून मॅच हरलो...

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद विजेते, 100 वर विजेतेपदे जिंकली

मराठीच्या ज्येष्ठ अभ्यासक, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी कार्याध्यक्ष आणि अ.भा. मराठी साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्ष डाॅ. माधवी वैद्य यांनी ५५ वर्षांपूर्वी नंदू नाटेकरांशी खेळलेल्या सामन्याच्या जागवलेल्या आठवणी...

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर (८८) यांचे बुधवारी पुण्यात निधन झाले. त्यांनी १०० पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेतपदे मिळवली होती. १९६५ मध्ये मलेशियातील सेलंगर स्पर्धा जिंकून आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावणारे ते पहिलेच भारतीय होते. त्यांना ‘गोल्डन बाॅय ऑफ इंडियन बॅडमिंटन’ असे म्हटले जात असे. औंध येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी १९५४ मध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. १९६१ मध्ये अमृतसर राष्ट्रीय स्पर्धेत ते ट्रिपल क्राऊन विजेते ठरले. ते ६ वेळा राष्ट्रीय पुरुष एकेरी विजेतेपदाचे मानकरीही ठरले. थॉमस कपमध्ये १६ पैकी १२ एकेरी सामनेही जिंकले होते. ते पहिल्या अर्जुन पुरस्काराच्या मानकऱ्यांपैकी एक होते.

साल बहुधा १९६३ -६४ असावं. कोयना धरणाची विविध कामं सुरू होती. तिथं अभियंते आणि इतर विविध विभागांतील मंडळींनी मनोरंजन आणि फिटनेसच्या उद्देशाने कोयनानगरात क्लब स्थापला. तिथे चांगल्या दर्जाचे बॅडमिंटन कोर्टही होते. मी तेव्हा काॅलेजमध्ये होते. सुट्टीसाठी बहिणीकडे कोयनेला आले होते. मुळात मी बॅडमिंटनपटू. शाळकरी असल्यापासून राज्य पातळीवर विविध स्पर्धांमधून बॅडमिंटन खेळत असे. कोयनेचे कोर्ट पाहून खुश झाले आणि रोज तिथे प्रॅक्टिस करू लागले. कोयनानगर इथेच एके दिवशी साक्षात नंदू नाटेकर यांना पाहिले. आम्हा नव्या उभरत्या खेळाडूंसाठी ते ‘हीरो’ होते. आदर्श होते.

कोयनानगरच्या क्लबमध्ये अधूनमधून नामांकित खेळाडूंना आमंत्रित करण्याची पद्धत होती. तसेच नंदू सर आमंत्रित म्हणून आले होते. अचानक एक मॅच खेळू, असे म्हणाले. लगेच मॅच ठरली आणि सुरूही झाली. आपल्या आदर्शासोबत थेट कोर्टवर उतरण्याचा विलक्षण प्रसंग मी अनुभवला. नाटेकर सर आणि क्लबचे सहकारी एका बाजूला आणि मी आणि आणखी एक सहकारी दुसऱ्या बाजूला, अशी मॅच लगेच सुरूही झाली. मला तर नेमकं काय चाललंय, हेच सुधरत नव्हतं, इतकं सगळं अकल्पित होतं. एक थरार निर्माण झाला होता. आनंद तर होताच, पण दडपणही प्रचंड होते. दोन गेम सलग जिंकून नाटेकर सरांनी आम्हाला पराभूत केले.

पण गेम जिंकल्यावर आमच्यापाशी येऊन ‘तुझा फ्लॅश उत्तम आहे. तो उचलणे अवघड आहे,’ असे म्हणत कौतुक केले होते, एवढे मात्र आठवते. आपला आदर्श असणारी व्यक्ती अशा पद्धतीने आपल्या समोर यावी, तिच्यासोबत खेळण्याची अकस्मात संधी मिळावी, त्यात पराभूत होण्याचा आनंद वाटावा... सगळे स्वप्नवत होते. लक्षात राहिले ते नाटेकर सरांचे राजस, संयमी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व. पुढे त्यांच्याशी परिचय झाला, तेव्हा आमच्या ‘अनन्वय’ संस्थेच्या कॅसेट्स ते आवर्जून विकत घेत आणि आवडीने ऐकत असत.

बातम्या आणखी आहेत...