आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, मुक्त विद्यापीठाच्या स्थापनेत मूलभूत योगदान देणारे दूरदृष्टीचे धोरणकर्ते डॉ. राम ताकवले (वय 90) यांचे शनिवारी रात्री उशिरा पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. ताकवले यांचा जन्म 11 एप्रिल 1933 रोजी झाला. सुरवातीपासून अभ्यासात अतिशय हुशार असणारे ताकवले यांनी उत्कृष्ट गुणवत्तेने फर्ग्युसन महाविद्यालयातून विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली आणि पुणे विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी रशियात मॉस्को विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली आणि ते पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून ते प्रसिद्ध होते. पुढे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी जबाबदारी निभावली.
शिक्षण क्षेत्रातील मूलगामी विचार सातत्याने सुरू असल्याने डॉ. ताकवले यांच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली आणि ते या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले. ही संकल्पना यशस्वी झाली आणि ताकवले सर राष्ट्रीय पातळीवर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचेही कुलगुरू झाले. दूरस्थ आणि मुक्त शिक्षण या संकल्पनेचा वेगळा विचार त्यांनी विविध व्यासपीठावर मांडला आणि ही संकल्पना व्यावहारिक पातळीवर अमलात आणून दाखवली. पुढे नॅशनल असेसमेंट अॅंड शनल कौन्सिल (नॅक) चे ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यांच्या शैक्षणिक कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थांनी त्यांना मानाची पदे देत सन्मानित केले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मुक्त आणि दूरस्थ शिक्षणाचा पाया घालून त्याचा विकास करण्याचे श्रेय ताकवले सरांचे आहे. शिक्षण विषयक विपुल लेखन त्यांनी केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.