आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन:ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ, प्राच्यविद्यापंडित डॉ. म. अ. मेहेंदळे यांचे निधन

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

संस्कृत - प्राकृत भाषा आणि प्राच्यविद्या या क्षेत्रात मूलगामी संशोधन करून जागतिक कीर्ती संपादन केलेले डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे (वय 102) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. मेहेंदळे यांच्या पार्थिवावर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉ. मेहेंदळे यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1918 रोजी झाला. मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून त्यांनी पदवी संपादन केली. त्यानंतर पुण्यात डेक्कन कॉलेजमधून त्यांनी पीएचडी मिळवली. ‘प्राकृत शिलालेखांचे ऐतिहासिक व्याकरण’ हा त्यांचा पीएचडी प्रबंध कॉलेजने ग्रंथरूपात प्रकाशित केला. मेहेंदळे सरांनी कर्नाटक, गुजरात, पुण्यासह अमेरिका आणि जर्मनी येथे संस्कृत अध्यापनाचे काम दीर्घकाळ केले. विदेशांत अनेक ठिकाणी त्यांनी संशोधन प्रकल्पही केले. निवृत्तीनंतर ते पुण्यात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत रुजू झाले आणि पूर्णवेळ त्यांनी संशोधनाला वाहून घेतले. महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीच्या संपादनात त्यांनी महत्तपूर्ण योगदान दिले. महाभारताची सांस्कृतिक सूची (कल्चरल इंडेक्स ऑफ महाभारत) आणि डिक्शनरी ऑफ संस्कृत ऑन हिस्टोरिकल प्रिन्सिपल्स, हे त्यांचे ग्रंथ जगविख्यात आहेत. संस्कृत, प्राकृत, मराठी आणि इंग्रजी या भाषांवर कमालीचे प्रभुत्व असलेल्या मेहेंदळे सरांचा पारशी धर्मग्रंथ अवेस्ताचाही विशेष अभ्यास होता. सर्व भाषांतून त्यांनी याविषयी विपुल लेखन केले. एशियाटिक सोसायटीचे ते सन्माननीय सदस्य होते. 2017 मध्ये साहित्य अकादमीने भाषा सन्मान प्रदान करून त्यांचा गौरव केला होता. अशोकाचे भारतातील शिलालेख, प्राचीन भारत - समाज आणि संस्कृती, वेदा मॅन्युस्क्रिप्टस, हिस्टॉरिकल ग्रामर ऑफ इन्स्क्रिप्शनल प्राकृत, रिफ्लेक्शन्स ऑफ संस्कृत ऑन हिस्टोरिकल प्रिन्सिपल्स, मराठीचा भाषिक अभ्यास, वरुणविषयक विचार हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

बातम्या आणखी आहेत...