आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोक आणि संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डाॅ. रामचंद्र देखणे यांचे निधन:उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार

पुणे8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संतसहित्य आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक-लेखक व ‘बहुरूपी भारूड’कार डाॅ. रामचंद्र देखणे (वय 66) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या घरामध्ये देखणे यांचा जन्म झाला. बी. एस्सी. आणि एम. ए. पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी पीएच. डी. संपादन केली. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. ३४ वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले. ‘संत विचार प्रबोधिनी‘ ही दिंडी घेऊन देखणे अनेक वर्षे सातत्याने पंढरीची पायी वारी करीत असत.

वैचारिक पुस्तकांचा समावेश

ललित, संशोधनात्मक तसेच चितनात्मक अशी त्यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये कथा, कादंबरी, संतसाहित्यावरील चिंतनात्मक, लोकसाहित्यावरील संशोधनात्मनक आणि सामाजिक विषयांवरील वैचारिक पुस्तकांचा समावेश आहे. विविध वृत्तपत्रे, दिवाळी अंक आणि संपादित ग्रंथांमधून त्यांचे दोन हजारांहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. ‘बहुरुपी भारूड’ या संत एकनाथांच्या पारंपरिक भारूडांचे त्यांनी अडीच हजारांहून अधिक कार्यक्रम महाराष्ट्रात, इतर प्रांतात तसेच अमेरिका, दुबई येथे सादर केले असून त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. राज्यातील विविध व्याख्यान मालांमधून विविध विषयांवर त्यांनी हजारो अभ्यासपूर्ण आणि रसाळ व्याख्याने दिली.

संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले

महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त मे 2010 मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे झालेल्या सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्र या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते सहभागी झाले होते. अमेरिकेतील विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये ते एका परिसंवादाचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 24 व्या विभागीय साहित्य संमेलन, महाराष्ट्र साहित्य सभेच्या इंदूर येथील शंभराव्या संमेलनाचे, बडोदा येथील मराठी वाङ्मय मंडळाच्या 68 व्या साहित्य संमेलनाचे, कडोली-बेळगाव येथील 21 व्या मराठी साहित्य संमेलनाचे, 12 व्या बंधुता साहित्य संमेलनाचे आणि विटा येथील 29 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्याशिवाय राळेगणसिद्धी येथे झालेल्या पहिल्या ग्रामजागर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

महत्त्वांच्या पुरस्कारांचा समावेश

लेखन, संशोधन, प्रबोधन आणि कलाविष्कारासाठी त्यांना महाराष्ट्र शासनासह विविध संस्थांनी पुरस्कार देऊन गौरविले होते. त्यामध्ये स्वामी विवेकानंद पुरस्कार, आचार्य अत्रे प्रतिष्ठानचा कलाकार पुरस्कार, रांजणगाव गणपती संस्थानचा महागणपती पुहरस्कार, गदिमा साहित्यभूषण पुरस्कार, भारूडाचार्य पुरस्कार, सत्यशोधक समाजभूषण पुरस्कार, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार अशा महत्त्वांच्या पुरस्कारांचा समावेश आहे.