आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जगातील सर्वात मोठ्या लस निर्मिती करणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून भारतासह इतर गरीब देशांसाठी कोरोना लसीचे आणखी दहा कोटी डोस निर्मिती आणि वितरण केले जाणार असून पुढील वर्षी पहिल्या सहा महिन्यांत या लसीचे वितरण करण्यात येणार आहे. यापूर्वी सीरमने ऑगस्ट महिन्यात दहा कोटी डोस पुरवण्याचे जाहीर केले होते. आता एकूण २० कोटी डोसची निर्मिती केली जाणार आहे.
सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी मंगळवारी ही घोषणा केली. भारतासह जगभरातील ९२ देशांना गॅव्ही या संस्थेकडून लसीकरणासाठी सहकार्य केले जाणार आहे. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनने यापूर्वी अकराशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून त्यांनी आणखी ११०० कोटी असे एकूण २२०० कोटी रुपये लसीकरणासाठी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे लस निर्मितीची क्षमता आणखी वाढवली जाणार आहे. तसेच गरज पडल्यास आणखी लस निर्मिती केली जाणार असल्याचे म्हटले आहे.
या लसीचे उत्पादन सीरमकडून सुरू असून त्यांची परिणामकारकता सिद्ध झाल्यास आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून परवानगी मिळाल्यास या लसींचे वितरण केले जाणार आहे, असे पूनावाला यांनी सांगितले.
एक डोस २२५ रुपयांचा
लसीच्या एका डोसची किंमत २२५ इतकी निश्चित केली आहे. अॅस्ट्राझेनेका आणि नोवावॅक्स या दोन कंपन्यांच्या लसींचा पुरवठा होणार आहे. अॅस्ट्राझेनेकाची लस ६१ आणि नोवावॅक्सची लस ९२ देशांमध्ये दिली जाणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.