आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र सरकार निर्णय घेणार का?:केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी केल्यानंतर राज्य सरकारवर दबाव; शरद पवारांनी म्हटले- आधी GST ची थकबाकी द्या, निर्णय घेणे सोपे जाईल

बारामतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोल आणि डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत. शंभरी पार केलेल्या प्रति लिटर पेट्रोलच्या दरांनी 115 चा आकडा देखील गाठला. आता मात्र, भाजप शासित केंद्र सरकारने पेट्रोलवरील करांमध्ये प्रति लिटर 5 रुपये आणि डिझेलचे प्रति लिटर 10 रुपये कमी केले. यानंतर राज्य सरकारने देखील असाच निर्णय घेऊन जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी राज्यातील भाजप नेते करत आहेत. त्यावरच शरद पवारांनी एका वाक्यात विरोधकांना शांत केले.

आधी महाराष्ट्राच्या GST चे पैसे द्या
दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधला. याच ठिकाणी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते शरद पवारांची भेट घेण्यासाठी जमले आहेत. यावेळी पत्रकारांनी पवारांना इंधन दर कपातीवर प्रश्न विचारला. केंद्र सरकारने इंधनाचे दर काही प्रमाणात कमी केले. आता राज्य सरकार सुद्धा दर कपात करणार का? याचे उत्तर देताना आधी जीएसटीचे पैसे द्या नंतर आपण यावर निर्णय घेण्यावर विचार करून असे पवार म्हणाले आहेत.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, त्याबाबत राज्य सरकारशी बोलावे लागेल. नागरिकांना दिलासा देण्याबाबत राज्य सरकारने सकारात्मकता दाखवलीच आहे. पण केंद्राकडे राज्याचे GST चे देणे आहे. ते केंद्राने द्यावे. तसे झाल्यास लोकांना मदत करण्याचा निर्णय घेणे राज्य सरकारला शक्य होईल. अर्थातच जीएसटीचे पैसे आल्यानंतर राज्य सरकार यावर विचार करू शकते असे संकेत पवारांनी दिले आहेत.

राज्यातील भाजप नेत्यांनी टाकला दबाव
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करांमध्ये कपात केली. यानंतर विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला सुद्धा असाच निर्णय घेऊन जनतेला दिलासा देण्याचे आवाहन केले. आपले सरकार असताना अशाच स्वरुपाचा निर्णय घेण्यात आला होता असेही त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रविण दरेकर यांनी सुद्धा राज्य सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

'भाजपला पराभूत करत राहा, दर कमी होत जातील'
दरम्यान, केंद्राने पेट्रोल आणि डिझेलची केलेली दर कपात अतिशय कमी आहे. निवडणुकांमध्ये पराभूत होत असल्याचे पाहता भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. निवडणुकीत भाजपला असेच पराभूत करत राहा इंधनाचे दर सुद्धा कमी होत जातील अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राउत यांनी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

बातम्या आणखी आहेत...