आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्र विकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोरोना विरोधात एकत्रित असून सर्वांचे नेते उद्धव ठाकरेच आहेत असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना महाराष्ट्र सरकारचे रिमोट आपल्या हातात असल्याचा दावा पवारांनी स्पष्टपणे फेटाळून लावला. महाविकास आघाडीचे नेते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असून त्यांच्या नेतृत्वात सरकार पूर्ण 5 वर्षे टिकणार आहे. एवढेच नव्हे, तर महाविकास आघाडीने पुढील विधानसभा निवडणुकीत सुद्धा एकत्रित लढण्याचा निर्णय घेतल्यास पुन्हा सत्तेवर येईल असा दावा राष्ट्रवादी अध्यक्षांनी केला.
पवार पुढे म्हणाले, कोरोनाची एकूणच परिस्थिती पाहता महाराष्ट्र आणि त्यातही मुंबईत चिंताजनक आहे. परंतु, गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या बाबतीत सुधारणा दिसून आल्या आहेत. "कोरोनाबद्दल बोलावयाचे झाल्यास महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रित आहेत. तसेच सर्व पक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाकरेंना पूर्णपणे पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे जे काही निर्णय घेतील त्यावर सर्वांचे एकमत आहे." सरकार कुठल्याही रिमोटने चालत नाही तर उद्धव ठाकरे आणि त्यांची टीम ते चालवत आहे. सगळेच एकरूप होऊन यात काम करत आहेत. सरकारच्या कुठल्याही निर्णय प्रक्रियेत आपला हस्तक्षेप नाही. तरीही चक्रीवादळ आणि इतर संकट काळांमध्ये काही वेळा मी परिस्थिती हाताळली आहे. लोकांच्या भेटी घेणे आणि त्यांच्या मनात विश्वास जागृत करणे मला आवडते.
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि विरोधकांचे सरकारवरील हल्ले वाढले आहेत. महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकणार नाही. आपल्याच कारनाम्यांनी हे सरकार कोसळणार आहे असे हल्ले माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह विविध नेत्यांकडून केले जात आहेत. परंतु, हे सरकार 5 वर्षे तर टिकणारच आहे. यासोबतच, पुढील विधानसभा निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला तर महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीची सत्ताच येईल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, लॉकडाउन लागू करण्याबाबत उद्धव ठाकरे आणि आपल्यामध्ये मतभेद होते का याबद्दल सांगताना ही गोष्ट काही प्रमाणात खरी असल्याचे पवार म्हणाले. लॉकडाउन संदर्भात काही प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेद होते. संपूर्ण मुंबई, पुणे आणि ठाणे लगेच उघडण्याला माझा विरोध होता. सरकारने ही ठिकाणे हळू-हळू उघडावीत असे माझे मत होते. मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमने सुद्धा त्यानुसारच निर्णय घेतले. राज्यातील परिस्थिती लवकरच पूर्व पदावर येईल असे राष्ट्रवादी अध्यक्षांनी सांगितले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.