आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''कलाक्षेत्रातून राजकारणात आल्यानंतर निवडून आलेला मी पहिला मराठी कलाकार आहे. हे महाराष्ट्रातील मतदारांना नवीन आहे. तुमच्या खासदाराचे उत्पन्नाचे साधन काय आहे, याचा विचार केला जात नाही. यासाठी राजकीय साक्षरता आवश्यक आहे. तुमचा "गोविंदा" होऊ देऊ नका, असे मला सुरुवातीला सांगणारे आता दूरध्वनी करून शाबासकी आणि शुभेच्छा देतात असे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.
दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित दिलखुलास गप्पांच्या कार्यक्रमात ते बोलत होते.पिंपरीतील एच. एच. कंपनीच्या मैदानावर ११ ते १६ मे दरम्यान शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत. याचे औचित्य साधून प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला.
कोल्हे म्हणाले, थिएटर आणि शो मिळत नाही म्हणून टीडीएम या मराठी चित्रपटातील कलावंतांना अश्रू अनावर झाले, अशी वेळ येणे, ही दुर्देवी गोष्ट आहे. शाहीर साबळे यांच्या जीवनावरील चित्रपट चांगल्याप्रकारे सुरू असताना, द केरला स्टोरी हा सिनेमा विनामूल्य दाखवला जात आहे, हे चुकीचे आहे.जगावे कसे हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिकवले. तर, शेवटच्या श्वासापर्यंत लढावे कसे, हे छत्रपती संभाजी महाराज यांनी शिकवले. प्रतिकूल परिस्थितीतही खंबीरपणे लढण्याची प्रेरणा संभाजी महाराजांकडून घ्यावी.
कोल्हे म्हणाले की, पुढची लोकसभा निवडणूक लढवायची की नाही, लढवली तर कोणत्या पक्षाकडून तथा कोणत्या मतदारसंघातून लढायची, याविषयी काहीही ठरवलेले नाही. योग्य वेळी परिस्थिती पाहून निर्णय घेईन. एखादे पद मिळालेच पाहिजे, असा अट्टाहास असता कामा नये.
लोकांच्या हितासाठी, प्रश्नांसाठी काम करत राहणे केव्हाही चांगले. पद, प्रतिष्ठा, पैसा हे एकीकडे ठेवले तरी महाराजांचा जिरेटोप, कवड्यांची माळ असणारे दुसरे पारडे माझ्यासाठी कायमस्वरूपी महत्त्वाचे आहे. ३५० वर्षे मागे जाऊन शिवरायांचा इतिहास सांगण्याची संधी मिळते, हेच माझ्या दृष्टीने भाग्याचे आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्यानुसार, एखादा मतदारसंघ म्हणजे आपली मक्तेदारी आहे, असे मानणे चुकीचे आहे. कधीतरी बदल होणारच आहे.
अजितदादांमुळेच खासदार होऊ शकलो
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मुख्यमंत्री होण्यासाठी डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकत्याच जाहीर कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या होत्या. त्या संदर्भातील प्रश्नावर खुलासा करताना डॉ. कोल्हे म्हणाले की, हे विधान अजित पवार की जयंत पाटील असे तुलनात्मक पातळीवर नव्हते. त्यामागे स्थानिक संदर्भ होते. अजित पवार यांच्यामुळेच आपण खासदार होऊ शकलो. पक्षप्रवेश, उमेदवारी या गोष्टी त्यांनी मोठ्या साहेबांच्या माध्यमातून करवून घेतल्या. अजितदादांचे पुत्र मावळ लोकसभा निवडणूक लढवत असतानाही तितकेच लक्ष अजितदादांनी शिरूरमध्ये दिले. त्यामुळेच अवघ्या २२ दिवसांच्या प्रचारात निवडणूक जिंकणे शक्य झाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.