आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाही देवस्थाने अंतःकरणात असतात. शेगाव, आळंदी आणि देहूमध्ये एक प्रकारचे मानसिक समाधान मिळते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते देहू येथे बोलत होते.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जीवन कार्यातील प्रसंगचित्रण दिनदर्शिका अनावरण सोहळा शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. या निमित्त तब्बल दोन तपानंतर शरद पवार यांनी संत तुकाराम मंदिरात जात दर्शन घेतले.
काय म्हणाले पवार?
शरद पवार यांनी देहू येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने संत तुकाराम महाराज मंदिरात जात दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी प्रतिभा पवारही उपस्थित होत्या. यावेळी शरद पवार म्हणाले की, संत तुकाराम महाराजांनी समाजाला योग्य दिशा दिली. मागाच्या चारशे वर्षांच्या काळात समाजात बदल घडवले. त्यात मोरे घराणे मूळ आहे. आता तुकाराम महाराज यांचा इतिहास दूरचित्रवाणीद्वारे पोहचवला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पवार पुढे म्हणाले की, मी देव-दानव यापासून लांब असतो. मात्र, काही देवस्थाने अंतःकरणात आहेत. त्यात शेगाव, आळंदी आणि देहूमध्ये एक मानसिक समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज यांचा आरोप
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या वर काही दिवसांपूर्वी ते नास्तिक असल्याचा आरोप केला होता. त्याच प्रमाणे हिंदू संघटना यांनी पवार इफ्तार पार्टी करतात. मात्र, मंदिरात जात नाहीत असा ही आरोप केला गेला होता. त्यानंतर शरद पवार यांनी 28 मे 2022 रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे बाहेरून दर्शन घेतले होते. हे दर्शनही त्यांनी तब्बल 30 वर्षांनंतर घेतले. त्याचीही चांगली चर्चा रंगली होती. मात्र, 'मी आज नॉनव्हेज खाल्ले असल्याने मंदिरात जाणे माझ्या बुद्धीला पटत नाही' असे पवारांनी सांगितल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षांनी दिली होती.
दोन दिवसांपू्र्वीही चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसांपूर्वी यांनी सासवरड्या एका मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. त्यावर शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी फेसबुकवर एक पोस्ट करून टीका केली होती. सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये मटण खाल्ले. त्यानंतर महादेव आणि सासवडला सोपणकाका मंदिरात जाऊन दर्शन घेतले, असा आरोप केला होता. विशेष म्हणजे शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडिओ आणि फोटोही पोस्ट केला होता.
बेरोजगारी, पाणी महत्त्वाचे...
शिवतारे यांच्या या पोस्टची आपल्याला माहिती नाही. बेरोजगारी, पाण्याचा प्रश्न या भागात गंभीर आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठीच मी फिरते आहे, असे उत्तर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी दिले होते. शिवाय मटण खाऊन मंदिरात गेल्याने काही होते का, असे विचारले असता आपला या विषयावर अभ्यास नाही म्हणत त्यांनी बोलणे टाळले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.