आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशस्वी होण्यासाठी शरद पवारांचा कानमंत्र:कॉंग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि डाव्या पक्षांनी एकत्रित निवडणुकीला सामोरे जावे

सातारा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस, राष्ट्रवादी, डावे आणि ठाकरे गटाने येत्या निवडणुकांना एकत्रित सामोरे जावे अशी विचारधारा आमच्यात आहे. त्यासंदर्भात एकत्र बसून निर्णय घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी कराडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. रयत शिक्षण संस्थेचे, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड, येथे रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त बांधण्यात आलेल्या "शताब्दी इमारती" चे उद्घाटन समारंभाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खा. शरद पवार हे कराड येथे आले होते. शरद पवार यांचे कराड विमानतळावर आगमन होताच त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत कराड उत्तर चे आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले. कार्यक्रमानंतर कराड येथे शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आम्ही आढावा घेतला नाही

शरद पवार म्हणाले, सध्या तरी आम्ही मतदार संघनिहाय आढावा घेतलेला नाही. पण तो घ्यावा लागणार आहे. भाजप निवडणुकीच्या तयारीला लागला असल्याबाबत विचारले असता 'कोण तयारीत आहे, हे निवडणूक निकालातून दिसले आहे, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

भाजपमध्ये गेल्यानंतर खटले रद्द केले

शरद पवार म्हणाले, अलिकडच्या काळात केंद्रीय तपास यंत्रणांनी अनेक जणांवर कारवाई केली आहे. काही लोकांना अटक करून त्यांच्यावर खटले दाखल केले, परंतु त्यातील काही जण भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरील केसेस काढण्यात आल्या. त्याची माहिती 9 पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे देऊन फेरविचार करण्याची विनंती पत्रात केली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

केंद्रीय यंत्रणांची प्रतिमा मलिन

शरद पवार म्हणाले, राज्यपाल सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचा मुद्दाही पत्रात नमूद करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्यांमध्ये राज्यपालांमुळे तेढ निर्माण होत असल्याची बाब पत्राद्वारे मोदींच्या निदर्शनास आणून दिली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. केंद्रीय यंत्रणांची प्रतिमा मलिन असून त्याबद्दल चिंता व्यक्त केली.

तर निकाल कसा लागेल?

शरद पवार म्हणाले, ज्या लोकांनी समिती नेमा आणि संजय राऊत यांना अटक करण्याची मागणी केली. त्यांनाच त्या समितीत घेतले आहे. एखाद्याने तक्रार केली असेल आणि तक्रार करणाऱ्या व्यक्तीलाच जज म्हणून नेमले तर त्याचा निकाल कसा लागेल. केंद्राची नाफेड संस्था आहे. शेती मालाचे भाव पडतात तेंव्हा नाफेड बाजारात खरेदीसाठी उतरते. नाफेडने कांदा खरेदी करावा. नाफेडने खरेदी केली तर कांदा उत्पादक शेतकरी वाचू शकतो. कांदा हे उत्पादन देणारे त्यांचे एकच पीक आहे. कांदा खरेदी सुरू केली असल्याचे केंद्राने म्हटले आहे, पण खरेदी सुरू झाली नाही.

बातम्या आणखी आहेत...