आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या जनता महागाई, बेरोजगारी , इंधन दरवाढ आदी प्रश्नांनी ग्रासलेली आहे. मात्र, या मुद्द्यावरून लक्ष्य विचलित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार जाती, धर्म, भाषांत जाणीवपूर्वक अंतर वाढवत आहे. दोन समाजात तेढ निर्माण करून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सरकार करतेय. लोकशाहीत लोकांच्या मतानुसार सत्ता स्थापन केली तर ठीक आहे. मात्र, सध्याचे सरकार हे पैशाच्या जोरावर मिळवणे सुरू आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी बुधवारी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांच्या वतीने आयोजित जनजागर यात्रा प्रारंभ प्रसंगी ते पुण्यात बोलत होते. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, राज्य महिला अध्यक्ष विद्या चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, प्रशांत जगताप यांच्या सह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
पैशांच्या जोरावर सरकार
पवार म्हणाले, सध्या केंद्र आणि राज्यातील सत्ता भारतीय जनता पक्षाकडे आहे. लोकशाहीत लोकांच्या मतानुसार सत्ता स्थापन केली तर ठीक आहे. मात्र, सध्याचे सरकार हे पैशाच्या जोरावर मिळवणे सुरू आहे. बळीराजांनी त्याचे शेतात उत्पन्न वाढवले तर त्याला चांगली बाजारपेठ दिली पाहिजे. मात्र, आजचे राज्यकर्ते शेतकऱ्यास घामाची किंमत देत नाही. उलट मध्यस्थास संरक्षण देत असून नागरिकांना महागाईच्या खाईत लोटून देत आहे.
म्हणून बेकारीत वाढ
शरद पवार म्हणाले, सामान्य माणसाच्या डोक्यावरील आर्थिक ओझे कमी करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना पुन्हा मतदारांनी संधी देऊ नये. उद्योगांना सरकार प्रोत्साहन देत नाही, नवीन उद्योगांना संधी देत नाही, म्हणून बेकारी वाढत आहे. आज सरकार विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेत नाही. मात्र, जाती धर्मात अंतर वाढवते आहे.
केवळ पुरुषांची मक्तेदारी नाही
शरद पवार म्हणाले, विधानसभा ,लोकसभा यामध्ये कर्तबगार महिलांना संधी दिली गेली पाहिजे. कर्तृत्ववान महिला त्यांचे अस्तित्व सिद्ध करत आहे, त्यामुळे राजकारण केवळ पुरुषांची मक्तेदारी नाही. जनजागर यात्रेच्या माध्यमातून राज्यातील गावोगावी जाऊन महागाई ,बेरोजगारी याबाबत जागृती करावी. एकजुटीने महिलांनी काम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करण्यावर भर द्यावा आणि सामान्य नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भूमिका घ्यावी असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.