आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखासदार राहुल गांधी हे देशातील एका राजकीय पक्षाचे प्रमुख नेते आहेत. लोकशाहीसंदर्भात चिंता करण्याबाबत त्यांनी परदेशात मत व्यक्त केले तर त्याबाबत आक्षेपार्ह काही नाही. महाविकास आघाडीमधील पक्ष आगामी काळात एकत्र राहण्याबाबत आम्ही विचार करत असून त्यात काँग्रेस असणे महत्त्वाचे आहे. देशातील गावागावात काँग्रेसचा विचार आणि कार्यकर्ता आहे. त्यांचे यश-अपयश सोडून द्यावे, पण त्यांचे महत्त्व कमी नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी पवार यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी पवार पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, पोटनिवडणुकीत लोकांचा आवाज या वेळी महाविकास आघाडीसोबत होता. भाजपचा गड असलेल्या कसबा मतदारसंघामध्ये अनेक वर्षे खासदार गिरीश बापट यांनी प्रतिनिधित्व केले. ते केवळ भाजपपुरते मर्यादित नव्हते तर त्यांनी अन्य पक्षांशी चांगले संबंध ठेवले होते. बापट यांना डावलून भाजपने निर्णय घेतला, त्याचा फायदा होईल असे आम्हाला वाटले होते. मात्र, तसे झाले नाही. माझी आणि रवींद्र धंगेकर यांची जुनी ओळख नाही. परंतु एक कार्यकर्ता म्हणून ते सक्षम होते. आघाडीमधील सर्व पक्ष आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केले म्हणून त्याचा विजय झाला. आगामी निवडणुकीत तिन्ही पक्षांनी एकत्र काम केले तर चांगला परिणाम दिसून येईल.
भाजपमध्ये गेलेल्यांची चौकशी नाही : अलीकडच्या काळात दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारी शाळा आणि शैक्षणिक संस्था यात केलेले भरीव काम पाहण्यास देशभरातून लोक येतात. परंतु हे काम करणाऱ्यांना केंद्र सरकारने अटक केली आहे. काही लोक भाजपमध्ये गेले की त्यांची चौकशी होत नाही. राज्यात अशी अनेक उदाहरणे आहेत. ठाणे, अकोल्यामध्ये यापूर्वी कोणाची चौकशी झाली, कोणाला अटक होणार होती हे सरकारने सांगावे, असेही त्यांनी सांगितले.
गळ्यातील रुमाल सेनेचा, हातातील घड्याळ राष्ट्रवादीचे अन् मी काँग्रेसचा : अशोक चव्हाण
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघात नुकताच एक विकास कामांच्या उद्घटनाचा कार्यक्रम पडला. या वेळी बोलताना चव्हाण यांनीही आघाडीचा साद दिली. चव्हाण म्हणाले, आपण विचार करत असाल की, माझ्या गळ्यात भगवा रुमाल आहे, हा रुमाल सेनेचा आहे. हातातील घड्याळ राष्ट्रवादीचे आणि उरलेला मी पूर्ण काँग्रेसचा आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळातही चव्हाण यांना आघाडीत जाण्याची इच्छा असल्याचे बोलले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.