आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडाची उभारणी स्वराज्याची राजधानी म्हणून केली. शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतरच्या काळात शिवतीर्थ रायगडाने अनेक स्थित्यंतरे अनुभवली. रायगड पुढची अनेक वर्षे शत्रूच्या ताब्यात होता. पेशव्यांनी दीर्घ काळानंतर रायगड पुन्हा मिळवला. तोपर्यंत गडावरील प्रचंड मोठा दप्तरखाना (अधिकृत पत्रव्यवहार आणि नोंदी) नष्ट करण्यात आला होता. या काळात रायगडावरील खासनिशी (दैनंदिन कारभार, महसूल आणि प्रशासन याची जबाबदारी) सांभाळणाऱ्या पोतनीस घराण्याकडे काही जुनी ऐतिहासिक कागदपत्रे सापडली असून, त्यामध्ये रायगडावरील तत्कालीन शिबंदीची आणि त्यासंबंधीच्या तपशिलांची अधिकृत नोंद मिळाली आहे, असे पांडुरंग बलकवडे यांनी स्पष्ट केले.
ऐतिहासिक नोंदीनुसार १७७२ मध्ये रायगड पेशव्यांच्या ताब्यात आला. तेव्हा खासनिशी सांभाळणारे पोतनीस घराणे होते. त्यांच्या वंशजांकडे आढळलेल्या अस्सल कागदपत्रांत रायगडावरील उपस्थित सैनिकांची, त्यांच्या पगाराची, पदांची, वयाची तपशीलवार माहिती मिळाली आहे. त्यानुसार रायगडावर तेव्हा ५२९ लढाऊ शिबंदी होती. ११ अंमलदार (अधिकारी) ५१४ हशम (पायदळ सैनिक) यांची पूर्ण यादी या कागदपत्रात आहे. त्यात काही बर्क॔दाज (बंदुकधारी) होते. प्रत्येकाचे नाव, वय, पद आणि पगाराची यामध्ये नोंद आहे. गडावरील प्रत्येकाला शस्त्र चालविता येणे बंधनकारक होते. गडावरील तोफा चालविण्यासाठी गोलंदाज होते, असे बलकवडे यांनी स्पष्ट केले.
सरंजाम किती आणि कसा
गडाची खासनिशी सांभाळणाऱ्यांनी नेमून दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी यासाठी त्यांना सरंजाम देण्यात आला होता, अशीही माहिती या कागदपत्रात आहे. त्यानुसार पोतनीस घराण्याकडे एक लाख, ७५ हजार ३०६ रुपयांचा सरंजाम होता. तो सांभाण्यासाठी त्यांना वर्षाला १५ हजार रुपये पगार देण्यात आले होते, अशी माहिती या कागदपत्रात नमूद करण्यात आली आहे, असे बलकवडे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.