आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शिक्षण विभागात खासगी शिक्षण संस्थेत अनुदानित पदावर शिक्षक भरती करण्यासाठी संस्थाचालक, पदाधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत करून अनुदानित पदावर शिक्षक भरतीसाठी आवश्यक व शासनाने नियमित केलेल्या भरती प्रक्रियेचा गैरवापर करून बाेगस पद्धतीने शिक्षक भरती करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गैरव्यवहाराची चौकशी पुणे जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग करत असताना सुमारे १५ शाळांची चाैकशी अंतिम टप्प्यात असून या शाळांमध्ये १०० पेक्षा जास्त बाेगस शिक्षक भरती झाल्याचे निष्पन्न होत असल्याने त्यासंदर्भात पुरावे जमा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
या प्रकरणात शिक्षक नेता आणि मुख्याध्यापक संभाजी शिरसाठ प्रमुख आराेपी असून त्याच्यासह २८ जणांवर बंडगार्डन पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आकुर्डीतील नवनगर शिक्षण मंडळाचा संस्थापक गाेविंद दाभाडे याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. शिक्षक भरती करण्यापूर्वी शिक्षण विभागाकडून अतिरिक्त शिक्षक शिक्षण विभागाकडे उपलब्ध आहेत की नाही यासंदर्भात लेखी विचारणा केली जाते. अतिरिक्त शिक्षक उपलब्ध नसल्यास त्याबाबत जाहिरात देऊन अर्ज मागवून त्यांची शैक्षणिक पात्रतेची खात्री करून मुलाखत घेऊन गुणवत्तेनुसार शिक्षक निवड करण्यात येते. संबंधित शाळेत कधीही शासनाच्या विनाअनुदानित तत्त्वावर भरती प्रक्रियेच्या मापदंडात पात्र नसताना आणि शाळेत कधीही न शिकवताही त्याबाबतची बनावट कागदपत्रे तयार केली. संबंधित शिक्षकांना अनुदानित पदावर भरती करून त्यांच्याकडून शिक्षक भरतीसाठी लाखाे रुपये उकळण्यात आले. तसेच शासनाचा पगार बनावट शिक्षकांना मिळवून देऊन शासनाची फसवणूक करण्यात आली आहे.
संच मान्यता २०१२-१३ यावर तत्कालीन उपशिक्षणाधिकारी पिराजी पाटील यांची स्वाक्षरी असून ती त्यांची नसल्याचे त्यांनी लेखी कळवले आहे. अशाच प्रकारे आराेपी गाेविंद दाभाडे याने सरस्वती प्राथमिक शाळेत सात शिक्षकांची, चिखलीतील संत तुकाराम महाराज माध्यमिक विद्यालयात सहा शिक्षक/ शिपायांची बनावट कागदपत्रांद्वारे बेकायदेशीर नियुक्ती केली आहे.
तुकडी मंजुरीचे अधिकार सरकारलाच
अनुदानित आणि विनाअनुदानित शाळेत तुकड्या मंजुरीचे अधिकार शासनास असून यासंदर्भात शासन स्तरावरून आदेश काढले जातात. तुकड्या मंजूर झाल्याचे शिक्षण उपसंचालक स्तरावरून शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी यांना कळवले जाते. परंतु तत्कालीन पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी दत्तात्रय शेंडकर यांनी उरळीकांचनच्या सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर येथील शाळेस पाचवी, सहावी, सातवीच्या विनाअनुदानित वर्ग जून २०१० पासून मंजूर केले. २०१२-१३ पासून संबंधित शाळेत बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन उपशिक्षक व एक पदवीधर शिक्षक अशी पदे बेकायदेशीर प्रकारे वाढवून नियुक्ती देण्यात आली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.