आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी मंत्री व शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेच्या सहा पदाधिकाऱ्यांना न्यायालयाने शनिवारी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या पदाधिकाऱ्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. मात्र, तपासात कोणतीही प्रगती झालेली नाही, असे नमूद करत न्यायालयाने हा आदेश शनिवारी दिला आहे.
शिवसेनेचे शहरप्रमुख संजय हरिश्चंद्र मोरे, हिंगोलीचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव नारायण थोरात, राजेश बाळासाहेब पळसकर, संभाजी हनुमंत थोरवे, सूरज नथुराम लोखंडे आणि चंदन गजाभाऊ साळुंके अशी न्यायालयीन कोठडी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी सामंत यांच्या वाहनचालकाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची गत मंगळवारी (2 ऑगस्ट) रात्री कात्रज चौकात सभा झाल्यानंतर तेथून जाणाऱ्या सामंत यांच्या वाहनावर जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात सामंत यांच्या कारची काच फुटली होती. या प्रकरणात पोलिसांनी शिवसेनेच्या सहा पदाधिकाऱ्यांना अटक केली होती.
पोलिस कोठडीची मुदत संपल्यावर या पदाधिकाऱ्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. पोलिसांना तपास करण्यासाठी योग्य ती मुदत देण्यात आली होती. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींपैकी कोणीही त्या दिवशी घटनास्थळी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे अॅड. हर्षद निंबाळकर, अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने सहा जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, या प्रकरणात शिवसेनेच्या सहा पदाधिकाऱ्यांनी जामीनासाठी अर्ज केला असून, त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.