आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेतून जे बंडखोरी करून बाहेर पडले आहेत त्यांनी त्यांच्या गद्दारीचे अनेक रंग दाखवले आहेत. गरजे आणि लायकीपेक्षा त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवून आम्ही त्यांना अनेक गोष्टी दिल्या, ही आमची चूक झाली, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी पुण्यात केली.
पुण्यातील कात्रज परिसरात आयोजित करण्यात आलेल्या 'निष्ठा यात्रे'च्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही तोफ डागली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खालच्या दर्जाचे राजकारण करत आहे. असे राज्यपाल कधी पाहिले नाही, असे ठाकरे म्हणाले. यावेळी खासदार विनायक राऊत, विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार सचिन आहेर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
बंडखोरांना जनता उत्तर देईल
आदित्य ठाकरे म्हणाले, बंडखोरांनी गद्दारीच केली असून त्यांना आपण उत्तर देण्याची गरज नाही. जनताच त्यांना आगामी काळात उत्तर देईल. सत्ता येते आणि जाते. मात्र, सध्या महाराष्ट्रात घाणेरडे राजकारण सुरू असून बंडखोरी केलेले जनतेचे नेते कधीच होऊ शकत नाही. गद्दार आता इकडे, तिकडे फिरत असून सांगतात की, आम्ही बंड, उठाव, क्रांती केली आहे. मात्र बंड करण्यासाठी ताकद, हिम्मत लागते. लोकांना बडखोरांचा खरा चेहरा दाखवायचा म्हणून मी महाराष्ट्रात फिरत आहे.
असे राज्यपाल पाहिले नाही
ठाकरे म्हणाले, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य विकासाने पुढे जात असताना, बंडखोर हे कुटील कारस्थान करत होते. राज्यात मी अनेक राज्यपाल पाहिले आहेत. अनेकवेळा मुंबईतील राजभवन या ठिकाणी गेलेलो आहे. आत्तापर्यंत अनेक मान्यवरानी हे पद भूषवले आहे. मात्र, सध्याचे राज्यपाल यांच्या इतके एखाद्या पक्षाची बाजू किंवा भेदभाव करत असलेले राज्यपाल पाहिले नाही. राज्यपाल जे राजकारण करतात ते राजकारण खालच्या दर्जाचे आहे. सातत्याने राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य करून मराठी भाषिकांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्राचे पाच तुकडे करण्याचे यांचे मनसुबे असून आम्ही ते कदापि होऊ देणार नाही. ठाकरे परिवाराला एकटे पाडण्याची भाषा बोलली जाते. मात्र, ठाकरे परिवार कदापी एकटा पडणार नाही. कारण सर्व शिवसैनिकच ठाकरे परिवाराचा भाग आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.