आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महत्वाची बातमी:जून 2024 पर्यंत शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण - जगदीश कदम, शालेय विद्यार्थी व त्यांच्या पालकांना विशेष सवलत

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने न-हे - आंबेगाव येथे साकारत असलेली ‘शिवसृष्टी’ पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना विशेष सवलत देण्यात येणार आहे. यावर्षी आजपासून ६ जून, २०२३ म्हणजेच शिवसाम्राज्य दिनोत्सवापर्यंत ही सवलत देण्यात येणार असल्याची माहिती महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर या वेळी उपस्थित होते.नुकतेच दि. १९ फेब्रुवारी, २०२३ रोजी शिवजयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे अर्थात ‘सरकारवाडा’चे लोकार्पण झाल्यानंतर आता दुसऱ्या चरणाचे काम सुरु झाले असून दि. ६ जून २०२४ पर्यंत दुसऱ्या चरणाचे लोकार्पण देखील संपन्न होईल, असेही कदम यांनी यावेळी सांगितले.

जगदीश कदम म्हणाले,येत्या ६ जून २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष सुरु होत आहे. त्यानिमित्त पुढील वर्षभर प्रतिष्ठानच्या वतीने अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास आणि पराक्रम शालेय विद्यार्थ्यांना आपल्या पालकांसोबत अनुभवता यावा, या उद्देशाने शाळांच्या सुट्ट्यांमध्ये शिवसृष्टीची सफर करताना आम्ही त्यांना ही विशेष सवलत देऊ करीत आहोत.

या अंतर्गत येत्या ६ जून २०२३, पर्यंत शिवसृष्टी पहायला येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांकडून रु. १२० ऐवजी रु. ८० तर त्यांच्या पालकांकडून रु. ३५० ऐवजी रु. २५० इतके प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहेत. शिवाय एकावेळी १० जणांच्या समूहाने नोंदणी केल्यास त्यांच्याकडून प्रत्येकी रु. २०० इतके प्रवेश शुल्क आकारण्यात येईल.

शिवसृष्टीमध्ये दुर्ग दर्शन, रणांगण (शस्त्र प्रदर्शन), शिवराज्याभिषेक सोहळा, २० मिनिटांचा आग्र्याहून सुटकेचा इतिहासाला कलाटणी देणारा थरार, १३ मिनिटांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरक भाषण याचा आनंद शिवप्रेमींना घेता येणार आहेच याशिवाय शिवसृष्टीमध्ये आता नाविन्यपूर्ण अशी रायगड सफर ही गतिमान खुर्चीवर बसून शिवप्रेमींना अनुभविता येईल.

दरम्यान शिवसृष्टी येथील भेटवस्तूंच्या विभागात शिवकालीन तसेच छत्रपतींच्या जीवनाविषयींची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याबरोबरच राजमुद्रा, शिवमुद्रा, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा अशा अनेक गोष्टी भेटवस्तू दालनात शिवप्रेमींना खरेदीसाठी उपलब्ध असतील. पुणे दर्शनमध्ये देखील शिवसृष्टीचा समावेश करावा यासाठी पुणे महानगरपालिकेशी आमचे बोलणे सुरु असल्याचे कदम यांनी संगितले.