आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील एसटी सेवेस 74 वर्ष पूर्ण होऊन ती 75 व्या वर्षात पदार्पण करत आहे. अशावेळी राज्यात पहिली एसटी सुरू झालेल्या पुणे-अहमदनगर मार्गावरच एसटीची पहिली ई-बस आजपासून सुरू होत आहे. ही घटना एसटीच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिली जाणारी घटना आहे, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी व्यक्त केले. दरम्यान,शिवाई ही बस प्रतितास 80 किलोमीटरने धावणार असून, तिच्या पुणे, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर मार्गावर फेऱ्या होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पुणे विभागाच्या या पहिल्या विद्युतप्रणालीवरील बसचे लोकार्पण आज स्वारगेट बस स्थानकावर करण्यात आले. पुणे ते अहमदनगर मार्गावर ही बस धावणार आहे. यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शखेर चंदे, अपर मुख्य सचिव आशिष सिंग उपस्थित होते.
टप्प्या-टप्प्याने राज्यभरात सेवा
शिवनेरी, अश्वमेध, शिवशाही अशा वातानुकूलित बस सेवेनंतर शिवाई ही ई-बस सुरू होत असून, यामध्ये 43 लोक प्रवास करू शकणार आहेत. याचा वेग 80 किलोमीटर प्रतितास असणार असून लवकरच टप्प्याटप्प्याने राज्यभरात ही बस सेवा सुरू करण्यात येतील. पहिल्या टप्प्यात पुणे ते औरंगाबाद, पुणे ते सोलापूर, पुणे ते नाशिक, पुणे ते कोल्हापूर यादरम्यान बस सेवा सुरू होणार आहे.
एसटीला कोणाची दृष्ट लागू नये
यावेळी अजित पवार म्हणाले, राज्यात 1932 साली पहिली खाजगी बस वाहतूक सुरू झाली. स्वातंत्र्यानंतर एक जून 1948 ला मुंबई प्रांतात पुणे-नगर ही एसटी बस प्रथम धावली. काळानुरूप एसटी प्रवासात वेगवेगळे बदल होत गेले. मागील दोन वर्षांपासून कोरोना संकटाची किंमत एसटीलाही मोजावी लागली. यादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचा संपही झाला. मात्र आपण एक परिवारातील असून कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये असेच आपले मत होते आणि आता एसटीला कोणचीही दृष्ट लागू नये.
उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न
राज्यात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे सुरू असलेल्या एसटी सेवेचा पूर्वीचा इंधनावरील खर्च 3,400 कोटी होता. मात्र, आता इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने हाच खर्च पाच ते सहा हजार कोटी पर्यंत वाढला आहे. मधल्या काळात सरकारने एसटीला मदत करण्यासाठी 2,600 कोटी रुपयांची मदतही दिली आहे. एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी काही फायदेशीर मार्गांची निवड करण्यात आली आहे, तसेच एसटी आगर याचाही वापर उत्पन्न वाढीसाठी केला जाणार आहे. तोट्यातील एसटी सेवा चांगल्या उत्पन्नात यावी दृष्टीने आगामी काळात प्रयत्न करण्यात येतील, असे मत यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.