आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहर हर महादेव... छत्रपती शिवाजी महाराज की जय...धर्मवीर संभाजी महाराज की जय... च्या घोषणांनी पुन्हा एकदा किल्ले सिंहगड दुमदुमून गेला. भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. शिवराज्याभिषेकाचा हा उत्सव यंदा देखील सिंहगडावर रविवारी उत्साहात साजरा झाला. फुलांनी सजविलेल्या पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे स्वागत पुणे दरवाजा येथे शिवप्रेमींनी पुष्पवृष्टीने केले. तर, शंखांचा निनाद आणि हलगी वादनाने संपूर्ण सिंहगडाच्या परिसरातील वातावरण शिवमय झाल्याचा भास होत होता.
विश्व हिंदू परिषद, पुणे श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती किल्ले सिंहगडच्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले सिंहगड येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ त्रयोदशीला दुपारी 12 वाजता पालखी सोहळ्याचे सिंहगडावर आगमन झाले. तत्पूर्वी छत्रपती राजाराम पूलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकपासून आयोजित विराट दुचाकी रॅलीत तब्बल दोन हजार शिवभक्त भगवे झेंडे हातात घेऊन सहभागी झाले होते. विराट दुचाकी रॅलीचे स्वागत नागरिकांनी विठ्ठलवाडी, हिंगणे, माणिकबाग, धायरी फाटा, किरकटवाडी, खडकवासला, डोणजे, सिंहगड पायथा अशा विविध ठिकाणी उत्साहाने केले. सोहळ्याचे यंदा पाचवे वर्ष आहे. प्रवेशद्वार व बुरुज फुलांनी सजविण्यात आले होते. तर, ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या.
पालखी सोहळ्याला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज सुरेशदादा मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्त मंत्री व सहसत्संग प्रमुख दादा वेदक, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, प्रांत मंत्री संजय मुरदाळे, समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, शरद जगताप, श्रीकांत चिल्लाळ, केतन घोडके, श्रीपाद रामदासी, समीर रुपदे, संपत चरवड, साईनाथ कदम, धनंजय गायकवाड यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
सिंहगडावरील वाहनतळापासून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी व कार्यक्रम मैदानापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत हलगी पथक, शंखनाद पथक यांसह पारंपरिक वेशातील महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज सुरेशदादा मोहिते यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीस अभिषेक झाला. तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे पूजन देखील करण्यात आले. तसेच सिंहगडावरील मंदिरे व ऐतिहासिक ठिकाणांचे पूजन देखील यावेळी झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.