आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शिवराज्याभिषेक सोहळा दिन :… अन् इंग्रजी चलनाचा डाव शिवरायांनी उधळला!

पुणे (जयश्री बोकील)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंग्रजांच्या नजरेतून राजे शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचे क्षण...

छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरील राज्याभिषेक हा भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण. या क्षणाची इत्थंभूत माहिती तत्कालीन इंग्रज वकील हेन्री ऑक्झिन्डेनने ३४६ वर्षांपूर्वी आपल्या रोजनिशीत लिहून इंग्रजांच्या मुंबईतील कन्सल्टेशनला कळवली. त्यातून इंग्रजी ‘नजरे’तून शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्यावर वेगळा प्रकाश पडतोच, पण महाराजांची कार्यतत्परता, इंग्रजांचे कुटिल डावपेच ओळखून, ते हाणून पाडण्याचा मुत्सद्दीपणाही दिसतो.

इतिहास तसेच प्राचीन नाण्यांचे युवा अभ्यासक आशुतोष पाटील म्हणाले, कारवार प्रमुख ५६ वर्षांच्या हेन्री ऑक्झिन्डेनला इंग्रजांनी वकील मुखत्यार म्हणून रायगडावर पाठवले होते. महाराजांनी इंग्रजांची राजापूर वखार लुटल्यापासून इंग्रज संधी शोधत होते. राज्याभिषेकाचे निमित्त करून नुकसान भरपाईसोबत भरीव काही पदरात पाडून घेण्याचा इंग्रजांचा डाव होता. त्यानुसार हेन्री रायगडावर नजराण्यासह उपस्थित झाला. त्याला राज्याभिषेकदिनी रायगडावर येण्याची परवानगी मिळाली. पाटील यांच्या माहितीनुसार, “राज्याभिषेकसमयी २,६९० रुपये किमतीचा हेन्रीने नजराणा महाराजांना पेश केला. मात्र तह पदरात पाडून घेण्याचा अंत:स्थ हेतूही होता. त्यातही तहातील ‘इंग्रजी नाणी महाराजांच्या राज्यात चालावी, ही धूर्त मागणी होती. महाराजांनी ती नेमकी जाणून तेवढीच वगळून अन्य कलमे मंजूर केली. हेन्रीने यादरम्यान रायगड, राज्याभिषेकाचे जे वर्णन लिहून पाठविले, तो ऐतिहासिक पुरावा ठरला आहे.”

हेन्रीची रोजनिशी : १६ हजार होनांनी झाली महाराजांची तुला

हेन्री रोजनिशीत लिहितो, ‘फितुरीखेरीज रायगड अभेद्य आहे. गडावर राजमहाल, दरबार, प्रधानांची घरे इत्यादी ३०० इमारती आहेत. अभिषेकसमयी महाराजांची तुला १६ हजार होनांची झाली. सिंहासनाधीश महाराजांचे वर्णन, सिंहासन पायरीवरील युवराज, सोबतच प्रधान मंडळ, महाराजांनी समीप येण्याची आज्ञा दिल्यावर हेन्रीला झालेले राजअधिकारदर्शन, मानचिन्हे, सुवर्णतराजू... याचे तपशील हेन्रीने लिहिले आहेत. राजदरबाराच्या प्रवेशद्वारापाशी सजवलेले हत्ती पाहून तर मी ‘हे वर कसे चढवले’ या आश्चर्यात मी बुडून गेलो, असेही हेन्री ऑक्झिन्डेनने नमूद केलेले आहे.

0