आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपने मला लोकसभेत पराभूत करण्यासाठी एमआयएम व वंचित बहुजन आघाडीला एक हजार कोटी रुपये दिले, असा खळबळजनक आराेप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जालन्यात केला हाेता. त्यावर आक्रमक होत वंचित बहुजन आघाडीने खैरेंच्या ताेंडाला काळे फासण्याचा इशारा दिला होता. त्यावर माघार घेत खैरेंनी ‘वंचित’ला क्लीन चिट देत मला एमआयएम म्हणायचे होते, असे घूमजाव केले आहे.
आपल्या आरोपांबाबत चंद्रकांत खैरे यांनी लेखी खुलासाही केला आहे. 'वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख अनवधानाने झाला, मी माझे शब्द मागे घेत आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता,' असे पत्र चंद्रकांत खैरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांना पाठवले आहे. त्यामुळे 2 जून रोजी खैरे यांच्याविरोधात होणारे वंचितचे आंदोलन रद्द करण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे चारित्र्य स्वच्छ आहे. त्यावर कोणीही शींतोडे उडवू शकत नाही. खोटे आरोप करून पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. त्यामुळे राजकीय विरोधकांनी बोलताना भान ठेऊन बोलावे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी व्यक्त केले आहे.
एक कोटीत किती शून्य
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ‘चार वेळा खासदार राहिलेल्या खैरेंना एका कोटीत किती शून्य असतात हेच माहिती नाही,’ अशी टोलेबाजी करत बुधवारी त्यांच्या आरोपांची खिल्ली उडवली. इतकेच नव्हे तर मला एक नव्हे, दहा हजार कोटी रुपये खैरेंनीच आणून दिले. त्यातील दोन हजार रुपये चहा-पाण्यासाठी काढून घेतले, असेही ते म्हणाले.
भाजपने रसद पुरवली
दोन वर्षांपूर्वी माझा लोकसभेत पराभव करण्यासाठी भाजपवाल्यांनी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला एक हजार कोटी रुपये दिले होते. भाजपकडून रसद पुरवली गेल्यानेच माझा निवडणुकीत पराभव झाला. वंचित आघाडीविषयी जे बोललो ते शब्द मागे घेतले आहेत. तसे त्यांच्या नेत्यांनाही सांगितले. माझ्या बाजूने हा विषय संपला आहे. माझा राग त्यांच्यावर नव्हे तर एमआयएम पक्षावर आहे. या एमआयएमने प्रकाश आंबेडकरांनाही फसवले आहे. इम्तियाज जलील यांनी बुधवारी केलेल्या वक्तव्याविषयी मला काहीही बोलायचे नाही.
- चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते
खैरेंचे मानसिक संतुलन बिघडले
पराभवामुळे खैरेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांनी आराेप करण्यापूर्वी ठाेस पुरावे द्यावेत किंवा माफी मागावी. नाहीतर आम्ही त्यांच्या ताेंडाला काळे फासू.
- अमित भुईगळ, महासचिव, वंचित बहुजन आघाडी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.