आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवचरित्र घराघरांत पोहोचवणारा तारा निखळला:महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रकथन अतिशय प्रभावीपणे करणारे महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज सकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरिक्षक यावेळी उपस्थित आहेत. पोलिसांकडून बाबासाहेब पुरंदरेंना अखेरची मानवंदना देण्यात आली.

पोलिसांकडून बाबासाहेब पुरंदरेंना अखेरची मानवंदना देण्यात आली.
पोलिसांकडून बाबासाहेब पुरंदरेंना अखेरची मानवंदना देण्यात आली.

ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी तोल जाऊन घरात पडल्याने बाबासाहेबांना दुखापत झाली होती. त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यांना वीस दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातच त्यांना न्यूमोनिया झाल्याने प्रकृतीची गुंतागुंत वाढली होती. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचा २९ जुलै २०२१ रोजी १०० वा वाढदिवस झाला होता . त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या.

राज ठाकरेंनी घेतले अंतिम दर्शन
राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाला पुष्पहार घालून अंत्यदर्शन घेतले. बाबासाहेब पुरंदरेंचे निधन झाल्याची बातमी कळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईहून पुण्याकडे येण्यासाठी रवाना झाले होते.

सुप्रिया सुळे यांनी घेतले अंतिम दर्शन
खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आहे. बाबासाहेबांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आठवणी, काम, लिखाण, साहित्य अनेक पिढ्यांसाठी जिवंत राहिल अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या अंत्यदर्शनासाठी पर्वती पायथ्यावर प्रचंड गर्दी
पुरंदरे यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पर्वती येथील वाड्यावर प्रचंड गर्दी झाली आहे. शिवशाहीरांचे अंतिम दर्शन घेण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. त्यामुळे पुण्यातील नागरिक पर्वतीकडे धाव घेत दर्शनासाठी गर्दी करत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक पुस्तके लिहिली
बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत आणि त्यांचे जीवन इतिहास आणि संशोधनासाठी समर्पित केले होते. 2019 मध्ये त्यांना भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण, आणि 2015 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

मान्यवरांकडून श्रद्धांजली
निधनाने आपण सर्वच एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो आहोत : मोहन भागवत, सरसंघचालक राष्ट्रीय स्वंयसेवक संघ
पद्मविभूषण व महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त आदरणीय श्री.बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने आपण सर्वच एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो आहोत. तरुण वयापासूनच देशभक्तीचा वसा त्यांना संघ शाखेतून प्राप्त झाला. तो ध्यास मनात ठेवून ध्येय प्राप्ती करिता तत्व रूप आदर्श पुरुष म्हणून छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज यांची भक्ती त्यांनी जीवनभर निष्ठेने चालवली. दादरा नगर हवेली च्या मुक्तिसंग्रामात सैनिक म्हणून तेहि लढले होते.

शिवाजी महाराजांची कथा आपल्या वक्तृत्वाच्या बळावर त्यांनी घराघरात पोहोचवली. त्यासाठी जीवनभर असंख्य परिश्रम केले. अत्यंत कठीण परिस्थितीतून केलेल्या या वाटचालीतुनच "जाणता राजा" सारख्या भव्य व प्रेरक नाट्य शिल्पाची निर्मिती त्यांनी केली. त्या देशभक्त व परिश्रमी शिवशाहीर यांचे पार्थिव जरी दृष्टीआड झाले तरी त्यांचे स्फूर्तीदायक जीवन समाजामध्ये पिढ्यानपिढ्या शिवरायांचा प्रताप व प्रेरणा सतत जागृत ठेवील. त्यांच्या पवित्र व प्रेरक स्मृतीला माझी व्यक्तिगत व राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विनम्र श्रद्धांजली.

इतिहास अभ्यासक, चरित्रकार, व्याख्याते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत याचे अतिव दुःख होत आहे : खा. उदयनराजे भोसले
शिवचरित्राचे गाढे अभ्यासक, जेष्ठ विचारवंत बाबासाहेबांनी नुकतीच वयाची शंभरी गाठली होती. या जगविख्यात इतिहासकाराने, कठोर परिश्रमाने आणि एखादया प्रमाणे, प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहाचवण्यासाठी अविरत प्रयत्न केले. सातारच्या छत्रपती घराण्याशी त्यांचा वेगळाच ऋणानुबंध होता.

शिवशाहीर ही पदवी, आमच्या आजी कै.राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले यांनीच, त्यांना सातारा येथे सन्मानाने बहाल केली होती. 1985 च्या दरम्यान जाणता राजा हे महानाटय मंचकावर आणुन बाबासाहेबांनी अव्दितिय कार्य केले. त्याचे काळाच्या पडद्याआड जाणे, मनाला चटका लावणारे आहे. बोलायला शब्दच नाहीत, इतिहास अभ्यासक्षेत्राचे तर कधीही भरुन न येणारे नुकसान त्यांच्या एक्झीटमुळे झाले आहे.

आम्ही पुरंदरे कुटुंबियांच्या दुःखात व्यक्तीश: आणि तमाम शिवप्रेमींच्या वतीने सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही आई जगदंबेचरणी प्रार्थना.

इतिहासाचा एक मोठा अध्याय संपला : खासदार प्रकाश जावडेकर
इतिहासाचा एक मोठा अध्याय संपला. बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचे नेतृत्व, कर्तृत्व आणि पराक्रम घराघरांत पोहोचविले. तीन पिढ्यांवर त्यांनी अद्भुत प्रभाव पाडला. चौथीमध्ये असताना त्यांच्या राजा शिवछत्रपती पुस्तकांचे दहाही खंड मी वाचले. त्यावरून शिवाजी महाराजांचे शंभर पानी चरित्र लिहिले. असा त्यांचा सर्वांवर प्रभाव असायचा. त्यांना विनम्र श्रद्धांजली!

...आज किल्ले रायगडही पाणावला असेल! : प्रवीण दवणे. ज्येष्ठ गीतकार, लेखक
मूर्तिमंत शिवकथा जगताना आपण अनुभवली!अथक व्यासंग, अपार लीनता, स्वभावातील वात्सल्य म्हणजे शिवशाहीर!शिवतेजाचा वाणीतून दिव्य संचार कसा होतो ते आमच्या पिढीने अनुभवले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेले राजा शिवछत्रपती हा ग्रंथ हाती देऊन आमची पालक पिढी निश्चिंत होत असे! त्या शिवशाहिरांचे कायमचे अंतर्धान होणे, हे पुन्हा एकदा मी माझे तीर्थरूप गमावण्याचे दुःख आहे!काय सांगू.., आज किल्ले रायगडही आर्त झाला असेल!असा शिवशाहीर होणे नाही!होणे नाही!मुजरा त्या तेजस्वी जीवनाला, ज्यांनी अविरत तेजाच्या बिया पेरल्या!शिवशाहीर आपण पुन्हा या!महाराष्ट्राची नवी पिढी आपली वाट पाहतेय!

बातम्या आणखी आहेत...