आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे कारागृहातील बंदीजनांसाठी आयोजित केलेल्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धेत सहभागी बंदीजनांनी स्वप्रतिभेची चुणूक दाखविली. ‘माणूस होऊन राहीन मी, वाईटाची साथ नको आता’, ‘दोषी मीच या समाजाचा, मार्ग दाखव आता’, ‘हे मानवा तू मानवता सोडू नको रे’ अशा काही स्वरचित रचना सादर करून भविष्यातील वाटचाल भक्तीमार्गाने करण्याची ग्वाही त्यांनी दिली. पश्चिम आणि दक्षिण विभागातील स्पर्धा झाल्या असून, मध्य आणि पूर्व विभागातील स्पर्धांना अनुक्रमे 13 आणि 22 जूनपासून सुरुवात होत आहे, अशी माहिती शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त संदीप राक्षे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अश्विनी पाचारणे उपस्थित होते.
समर्पित भावनेने संतरचना
खाबिया म्हणाले, स्पर्धेची सुरुवात अहमदनगर जिल्हा कारागृहात 20 मे रोजी झाली, तर स्पर्धेचा समारोप 30 जून रोजी अमरावती जिल्हा कारागृहात होणार आहे. सहभागी स्पर्धक संघांची संख्या 29 आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांनी तीन संतरचना आणि बंदीजनानंची एक स्वरचित रचना सादर करण्याची अट आहे. आपातर्यंत 12 कारागृहात स्पर्धा झाली असून तेथील स्पर्धकांनी स्वरचित रचनेची मुख्य अट पाळली आहे. प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि परीक्षक असे आठ जण प्रत्येक कारागृहात जाऊन स्पर्धेचे परीक्षण करीत आहेत. बंदीजन असले तरी त्यांच्यातील उपजत गुणांना संगीत मार्गदर्शकांमुळे वाव मिळाला असून ते स्पर्धेत मोठ्या जिद्दीने सहभागी झाले असल्याचे दिसून आले आहे. बंदीजनांमध्ये चांगले गायक, वादक आहेत, त्यांनी समर्पित भावनेने संतरचना सादर केल्या आहेत. स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तरुणांपासून वयाची 80 वर्षे पार केलेले बंदीजनही सहभागी झाले आहेत.
जडले जिव्हाळ्याचे नाते
क्षुल्लक कारणामुळे रागाच्या भरात घडलेला अपराध अनेकदा कारागृहात येण्यास भाग पाडतो. क्षणाची चूक आणि जीवनभराची सजा यामुळे बंदीजनांमध्ये अपराधाची भावना, नकारात्मक विचार जास्त प्रमाणात असतात. कुटुंब, समाजापासून दुरावलो आहोत याची सल मनाला बोचत असते. अशा भावना बंदीजन बोलून दाखवितात. तुरुंगाच्या चार भिंतीत जगतानाही बंदीजनांचे उर्वरित आयुष्य चांगल्या मार्गान जावे, सकारात्मक राहावे यासाठी तुरुंग प्रशासनही प्रयत्नशिल असल्याचे जाणवते. स्पर्धेच्या निमित्ताने पश्चातापाची जाणीव झालेल्या बंदीजनांच्या मनात संतविचारांची पेरणी झाली, सकारात्मक विचारांनी मनोबल वाढले, भक्तीमार्गाची ओढ लागली आहे, त्यामुळे भविष्यातील वाटचाल हे बंदीजन योग्य मार्गानेच करतील अशी भावना कारागृह अधिकाऱ्यांची नोंदविली असल्याचे लक्ष्मीकांत खाबिया यांनी यावेळी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.