आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सिलिकॉन कोटींगमुळे पंढरपुरातील विठ्ठल, रुक्मिणीच्या मूर्तींचे आयुष्य वाढणार; संवर्धनामुळे येणार नवीन झळाळी

औरंगाबाद/सोलापूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुरातत्त्व खात्याच्या निगराणीत झाले काम, पाण्यासारख्या पातळ रसायनाचा थर

महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील मूर्तीला आणखी झळाळी येणार आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याच्या विज्ञान शाखेच्या वतीने बुधवारी मूर्तीवर सिलिकॉन कोटिंगचा थर देण्याची ईपाॅक्सी प्रक्रिया करण्यात आली. यापूर्वी ३ वेळा असा थर दिलेला आहे. मूर्तीची झीज झाल्याच्या अहवालानंतर मंदिर समितीच्या मागणीनुसार रासायनिक लेपन करण्यात आले. ११-१२ व्या शतकातील श्री विठ्ठलाची मूर्ती वालुकामय स्वरूपाची आहे. रुक्मिणी मातेची मूर्ती गुळगुळीत शाळिग्राम पाषाणाची आहे. पदस्पर्शामुळे विठ्ठल व रखुमाईच्या मूर्तींच्या पायाची झीज झाली आहे. मूर्तीचे संवर्धन, झीज कमी व्हावी यासाठी रासायनिक वज्रलेप केला.

कोटिंगमुळे पाच वर्षे निश्चिंती
मिश्रा म्हणाले, संग्रहालयातील मूर्तीच्या दुरुस्तीनंतर तिचे वय ५० वर्षे वाढते. पण मंदिरातील मूर्तीचे वय झीज वारा, तापमान, आर्द्रता, स्पर्श, गर्दीवर अवलंबून असते. संवर्धनानंतर ५ वर्षे तरी मूर्ती सुव्यवस्थित राहते. विठ्ठल मंदिरात दही, मध, साखरेचा अभिषेक बंद केला आहे. दुग्धस्नानही पूर्णपणे बंद करण्याचा सल्ला दिला आहे.

सिलिकॉन रेझिनचे लेपन
एएसआयच्या विज्ञान शाखेचे उपाधीक्षक पुरातत्त्व रसायनज्ञ श्रीकांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखालील टीमने बुधवारी सिलिकॉन रेझिनचा (वाळूपासून तयार केलेला पदार्थ) आणि पाण्यासारख्या रंगहीन पदार्थाचा थर दिला. मूर्तीवर पाणी साचण्याची प्रक्रिया थांबल्याने तिची झीज थांबते. आता हा थर वाळल्यावर मूर्तीची चमक वाढेल.

वज्रलेप म्हणजे... वज्र म्हणजे दगड, तर लेप म्हणजे थर. दगडाला वाचवण्यासाठी लावलेला थर म्हणजे वज्रलेप. यालाच एएसआयच्या भाषेत प्रोटेक्टिव्ह कोटिंग म्हणतात. आयुर्वेदात वज्रलेपचा उल्लेख आहे. पण दगडाला वाचवण्यासाठी नेमका कोणता लेप वापरायचा, याची माहिती नाही. यामुळे आम्ही रासायनिक संवर्धनच करतो, असे मिश्रा म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...