आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार प्रदान:कोल्हे दाम्पत्य आणि मासूम संस्थेचा सिंधुताई सपकाळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त गौरव

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देत 'यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा' बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न झाला आहे. यावेळी प्रसिद्ध कवी वैभव जोशी यांचा आणि माईंना आवडणारा 'सोबतीचा करार' या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले.

प्रथम वर्षीचा हा पुरस्कार अमरावतीतील मेळघाटमधील डॉ. रविंद्र व डॉ. स्मिता कोल्हे यांना, तसेच पुण्यातील पुरंदरमधील डॉ. मनिषा गुप्ते आणि डॉ. रमेश अवस्थी यांची महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ 'मासूम संस्था' यांना प्रदान करण्यात आला. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि उद्योजक अशोक खाडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

माईंच्या पहिल्या स्मृतिदिनी आम्हाला हा पुरस्कार मिळावा ही आमच्यासाठी पाठिवरची थापही आहे आणि आज माईंची उणीवही भासते. माईंचं बोट धरून आम्ही मेळघाटात आलो आणि अविरत काम केलं, याची प्रेरणा माईच देऊ शकतात, असं मत डॉ. स्मिता कोल्हे यांनी मांडले.अभिमन्यूला जे बाळकडू मिळालं नाही, ते आम्हाला माईंकडून मिळालं. त्याग आणि वैराग्य यांचा योग्य समन्वय माईंमध्ये होता. माईंच्या अनेक लेकरांपैकी आम्हीही आहोत, असं मनोगत पुरस्कार्थी समाजसेवक डॉ. रविंद्र कोल्हे यांनी व्यक्त केले. माईंच्या स्मृतिदिनी त्यांचा वारसा, त्यांचं काम पुढे घेऊन जाणाऱ्या लोकांना सन्मानित केल्याबद्दल माई परिवाराचं कौतुक, अशा भावना मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केले.

'पुरस्कार कोणाला द्यायचा यावर माई परिवारात खूप चर्चा झाली. या चर्चेतून, माईने जिथे कामाला सुरुवात केली त्या मेळघाटातील डॉ. कोल्हे दाम्पत्य आणि माईने जिथे आपली संस्था उभी केली त्याच पुरंदर तालुक्यातील मासूम संस्थेचे नाव पुढे आले. मागील एक वर्षात माई परिवाराला अनेक चढ-उतारांना सामोरे जावं लागलं. मात्र अशाही परिस्थितीत अनेक मदतीचे हात आपल्या परिवाराला मिळाले, त्यांची मी ऋणी आहे' असे मत आपल्या प्रास्ताविकात सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या आणि त्यांचा वारसा पुढे नेणाऱ्या ममता सिंधुताई सपकाळ यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया देसाई यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...