आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Sindhutai Sapkal Funeral | Marathi News | Sindhutai Sakpal | Pune | Funeral Sindhutai Sakpal At Thosar Paga In Pune According To Mahanubhav Sect.

अनाथांची माय गेली:पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील ठोसर पागा याठिकाणी महानुभाव पंथानुसार अंत्यसंस्कार

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शेकडो अनाथ, निराधार जीवांना आपल्या मायेच्या पदराखाली घेत आधार देणाऱ्या आणि त्यांची ‘माय’ झालेल्या ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ (७४) यांचे मंगळवारी रात्री 8 वाजून दहा मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील ठोसर पागा येथे आज दुपारी 12 वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर महानुभाव पंथीयांच्या प्रथेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे कन्या ममता, नातेवाईक सुरेश वैराळकर यांच्यासह मोठा परिवार आहे.

मंगळवारी रात्री झाले होते निधन
जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी रात्री 8 वाजून दहा मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई गेल्या दीड महिन्यापासून गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, उपचार सुरू असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

‘मुलांची परवड होऊ देऊ नका, त्यांना नीट सांभाळा’
‘माझी मुलं कशी आहेत, त्यांना व्यवस्थित सांभाळा. त्यांची परवड होऊ देऊ नका.!’ हे माईंचे अखेरचे उद्गार. शेवटपर्यंत ती मुलांचाच विचार करीत होती. तीन दशके सोबत काम करणाऱ्या सिंधुताईंच्या मानसकन्या कीर्ती वैराळकर यांनी आपल्या लाडक्या ‘माई’विषयी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दांत.

‘मी माईंसोबत ३० वर्षांपासून काम करते आहे. त्यांनी अत्यंत कष्टातून राज्यातील विविध भागात संस्थात्मक कामे उभी केली आहेत. मांजरी येथील आश्रमात शंभर मुले आहेत. सासवड येथील ममता बालिकाश्रमात शंभर मुली राहतात. शिवाय वर्धा येथे ३५० गाईंचा सांभाळ करण्यासाठी गोशाळा आहे. शिरूरला संस्था आहे. त्यांनी संपूर्ण जीवनभर लेकरांच्या पुनर्वसनासाठी कष्ट केले. मंगळवारी दुपारी अडीच वाजता मृत्यू ओढवणार असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळेच त्यांनी ‘माझी मुलं कशी आहेत..? त्यांचा नीट सांभाळ करा, त्यांना काही कमी पडू देऊ नका. त्यांची काळजी घ्या. मुलांकडे लक्ष ठेवा..!’ असेच उद्गार काढले.

माईंच्या अखेरच्या क्षणी ममता दिदींसह माईंचे सर्व सहकारी सोबत होते. त्यांचे अकाली जाण्याने आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काहीच सुचेनासे झाले आहे. माई देहाने जरी आमच्यात नसल्या तरी त्यांनी उभे केलेल्या कार्याच्या रूपाने सातत्याने आमच्यातच राहणार आहेत. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळतच राहणार आहे. त्यांची प्रेरणा पाठिशी राहणार आहे. त्यांनी सुरू केलेले कार्य आम्ही अविरतपणे सुरूच ठेऊ.

बातम्या आणखी आहेत...