आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआध्यात्म हीच भारताची खरी शक्ती होती. गेल्या काही वर्षांत तिची ओळख पुन्हा जनतेला होत आहे. या शक्तीचे संवर्धन करून देशाला जगात महत्त्वाच्या स्थानी स्थापित करण्याचे स्वप्न साकार केले पाहिजे. अध्यात्म, वैश्विक तत्वज्ञान आणि संत-महात्मात्यांचा शुभाशिर्वाद भारताला विश्वगुरू बनवण्याचे स्वप्न साकार करेल असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
महामंडलेश्वर शिवानंद महाराज प्रतिष्ठान व मातोश्री विजया नाईक सामाजिक फाउंडेशनच्या पुढाकारातून महाराष्ट्राच्या इतिहासात पुण्यात पहिल्यांदाच झालेल्या साधू-संत-महंत संमेलन व दर्शन सोहळ्यात श्रीपाद नाईक बोलत होते. वर्धमान सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या या संमेलनावेळी हरियाणा येथील महंत कालिदास महाराज, पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंत्री अशोक महाराज, हरिद्वार येथील महामंडलेश्वर प्रेमगिरी महाराज,हरिगिरी महाराज, किन्नर जुना आखाड्याच्या महामंडलेश्वर दीपा राजमाने (जगवाली), महामंडलेश्वर शिवानंद महाराज यांच्यासह अनेक मठाधिपती, नागा साधू, वाचासिद्धी संत, महात्मे उपस्थित होते.
श्रीपाद नाईक म्हणाले, छोट्या चुकीमुळे आपला देश पारतंत्र्यात गेला. त्यावेळी देशातील संत समाज आणि आध्यात्मिक शक्तीमुळेच देश पुन्हा उभा राहिला. संतांच्या आशिर्वादांमुळे सत्य आणि नीतीमत्तेच्या मार्गावर चालत राहिलेला हा देश सातत्याने प्रगतिपथावर आहे. संतांच्या भेटीने व्यक्तीचा भाग्योदय होतो. देशाला भविष्यात अग्रस्थानी नेण्यासाठी देखील हीच आध्यात्मिक, धार्मिक शक्ती साहाय्यक ठरेल. साधू-संतांची परंपरा आपण जगली व जागवली पाहिजे. साधू-संतांच्या शरणागतीत आणि मार्गदर्शनात आपल्या जीवनाचे समाधान, विश्वाचे कल्याण होणार आहे.
कालिदास महाराज म्हणाले, काही वर्षांपूर्वीपर्यंत प्रभू श्री राम मंदिराचा मुद्दा वादात होता. तो प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्याने मार्गी लावला. गंगा स्वच्छता अभियान चांगल्या पद्धतीने राबविले जात आहे. आता केंद्र सरकारने गोवंश संरक्षण आणि संवर्धनावर लक्ष्य केंद्रित केले पाहिजे. गोवंश असेल तर देश टिकेल आणि गोवंश असेल तर भारताला वैश्विक महाशक्ती होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. युवा पिढीने सद्सद्विवेक बुद्धीने काम करावे.
मठाधिपती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुरुवर्य प्रकाश शिंदे म्हणाले, देशभरातून आलेल्या महंतांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या पवित्र उपस्थितीत मठाधिपती पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. हा माझा पुनर्जन्म झाल्याची अनुभूती झाली आहे. लवकरच नगर रस्त्यावरील 11 मारुती जागृत मठ उभारणार आहे. अध्यात्मिक ऊर्जेने हा नवा प्रवास जबाबदारीने पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.