आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवारपासून (2 मार्च) सुरू होत आहे. यंदा राज्यभरातीलल 15 लाख, 77 हजार, 256 विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. ही परीक्षा 25 मार्चपर्यंत सुरू राहील. यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 61 हजार 708 इतकी घट झाली आहे.
राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक तसेच माणिक ठकार यावेळी उपस्थित होते.
दहावी परीक्षा देणाऱ्या राज्यातील एकूण विद्यार्थ्यांमध्ये 8 लाख, 44 हजार, 116 विद्यार्थी तर 7 लाख, 33 हजार, 67 विद्यार्थिनी आहेत. तसेच 8 हजार 189 दिव्यांग विद्यार्थी व 73 ट्रान्सजेंडर विद्यार्थी आहेत. राज्यातील 23 हजार 10 शाळांतून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. राज्यात एकूण 5 हजार 33 मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार आहे. परीक्षा पारंपरिक पद्धतीने होईल आणि 100 टक्के अभ्यासक्रमावर आधारित असेल (कोरोनाकाळात 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घेतली होती) असे गोसावी यांनी स्पष्ट केले.
प्रश्नपत्रिका कस्टडीतून केंद्रांवर तसेच केंद्रांतून वर्गापर्यंत जाताना प्रत्येक वेळी चित्रीकरण केले जाईल, जीपीएस ट्रॅकिंग केले जाईल. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवला जाईल. बैठी व भरारी पथके कार्यरत असतील, अपरिहार्य कारणामुळे परीक्षा देता आली नसल्यास आऊट ऑफ टर्न सुविधा 27 ते 29 मार्च या काळात उपलब्ध असेल. पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट दरम्यान आयोजित केली जाईल, अशी माहिती मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
राज्य मंडळाची दिलगिरी
इयत्ता बारावीच्या परीक्षेत इंग्रजी प्रश्नपत्रिकेत झालेल्या चुकांबद्दल राज्य मंडळाने दिलगिरी व्यक्त केली आहे. अशा प्रकारांमुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक अशा घटकांमध्ये मंडळाविषयीची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते, याची जाणीव आहे. मात्र, या प्रकाराविषयी लवकरच संबंधितांवर कारवाई होईल. विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ दिले जाणार नाही, असे मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केेले.
यंदा विद्यार्थी घटले
राज्य बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये यंदा 61 हजार 708 विद्यार्थ्यांची घट झाली आहे. इतर बोर्डांकडे वळलेले विद्यार्थी, बहिस्थ पद्धतीने परीक्षा देणारे विद्यार्थी, एक कुटुंब एक मूल याचा प्रभाव आणि कोरोना संकट अशी काही कारणे विद्यार्थ्यांची संख्या घटण्यामागे आहेत.
विद्यार्थीसंख्येतील घट
2019 - 16 लाख, 99 हजार, 465
2020 - 17 लाख, 65 हजार, 829
2021 - 16 लाख, 58 हजार, 614
2022 - 16 लाख, 38 हजार, 964
2023 - 15 लाख, 77 हजार, 256
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.