आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरटे पोलिसांवर भारी!:पोलिसांनी अडवताच केला चाकूहल्ला; पोलिसांनी पिस्तूल रोखूनही चोर पळून जाण्यात यशस्वी!

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कार चोरी करून पळून जाणारे दोन चोरटे आणि रात्र गस्तीवरील तीन पोलिसांमध्ये चकमक उडाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर गडी-देहूरोड रस्त्यावर घडली पण यात चोरटे पोलिसांना भारी पडले. पोलिसांनी त्यांना अडवताच पोलिसांवर चोरांनी चाकूहल्ला केला पोलिसांनी त्यांच्यावर पिस्तूलही रोखले पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही आणि चोर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले.

पोलिसांनी रोखले पिस्तूल!

पोलिस कर्मचाऱ्यांवर चोरट्यांनी चाकूने वार केला. तर, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आणि चोरट्यांना पकडण्यासाठी चोरट्यांवर पिस्तूल रोखले. मात्र, अंधाराचा फायदा घेत दोन्ही चोरटे डोंगराच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. दरम्यान पोलिसांनी तत्परतेने कारवाई केल्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी संबंधित पोलिसांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

यमुनानगर परिसरातून शुक्रवारी रात्री चोरट्यांनी इको स्पोर्ट्स कार चोरली. याच दरम्यान रात्री गस्तीवर जाण्यापुर्वी चिखली पोलिस ठाण्यात नोंद करुन असणारे पोलिस निरीक्षक अजय जोगदंड निघाले होते. तेव्हा कारच्या मूळ मालकाने पोलिसांची गाडी पाहिली आणि गाडी थांबवून आपली कार चोरीला गेल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी कारचा क्रमांक, रंग आणि इतर माहिती घेत कारचा शोध सुरू केला. जोगदंड यांनी याबाबत कंट्रोलला फोन करुन माहिती दिली आणि नाकाबंदी लावण्यास सांगितले.

कारचा पोलिसांनी केला पाठलाग

निरीक्षक जोगदंड आणि त्यांच्यासोबत असणारे पोलिस अंमलदार निशांत काळे आणि प्रदीप गुट्टे हे भक्ती-शक्ती चौकातून जात असताना त्यांना चोरीला गेलेली इको कार दिसली. त्यामुळे पोलिसांनी आपल्या गाडीच्या लाईट्स बंद करून त्या कारचा पाठलाग सुरु केला. मात्र, चोरे कार वेगाने पळवत असल्याने ते पोलिसांच्या टप्प्यात येत नव्हते.

फिल्मीस्टाईल

निगडी-देहूरोडच्या सीमेवर समोर एक ट्रक असल्याने, चोरट्यांनी कारचा वेग कमी केला. त्यावेळी पोलिसांनी आपली गाडी या चोरीच्या कारला आडवी लावली. त्यानंतर पोलीस निरीक्षक जोगदंड हे गाडीच्या खाली उतरून चोरट्यांकडे धावले. त्यांनी कारच्या खिडकीतून आत हात घालत चावी काढण्याचा प्रयत्न केला.

निरीक्षकांनी वाचवला स्वतःवरील वार

चाबी काढणाऱ्या जोगदंड यांच्या हातावर चोरट्याने मारहाण केली. त्याच वेळी पोलिस कर्मचारी काळे आणि गुट्टे यांनी कारला दोन्ही बाजूने घेरले. चोरट्यांनी त्यांच्याकडील चाकूने पोलिसांवर वार केला. जोगदंड यांनी स्वतःवरील वार वाचवला. मात्र, एका पोलिस कर्मचाऱ्याच्या हाताच्या बोटाला इजा झाली. त्यानंतर कारमध्ये आणखी दोन मोठे चाकू असल्याचे पोलिसांना दिसून आले.

अंधाराचा फायदा घेत चोर पसार

''याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय जोगदंड म्हणाले यांनी सांगितले की, 'रात्री गस्त सुरू असताना रस्त्यावरच एका व्यक्तीने थांबवून आपली कार चोरीला गेल्याचे सांगितले. त्यानुसार शोध घेत असताना चोरीची कार दिसून आली. चोरीच्या कारचा पाठलाग करत चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी मोठ्या चाकूने पोलिसांवर वार केला. पिस्तूल रोखल्याने चोरटे हत्यार टाकून अंधाराचा फायदा घेत पळाले.

बातम्या आणखी आहेत...