आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला माध्यम क्षेत्रासाठी पदवी आणि सर्टिफिकेट कोर्स राबवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे माध्यम क्षेत्रात करीअर करू इच्छिणाऱ्या मुलींना शिक्षणासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू झाले असून कोणत्याही शाखेतून १२ वी पास विद्यार्थिनी प्रवेश घेऊ शकतील.
पदवी अभ्यासक्रम
भारतात स्त्री शिक्षणाची प्रवर्तक संस्था मानल्या जाणाऱ्या महर्षी स्त्री शिक्षण संस्थेत श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालयांतर्गत २०१३ पासून स्मार्ट म्हणजेच स्कूल ऑफ मीडिया अॅक्टिव्हिटी रिसर्च अँड टेक्नॉलॉजी ही माध्यम प्रशिक्षण संस्था कार्यरत आहे. याठिकाणी माध्यम क्षेत्रातील तज्ज्ञ शिक्षकांसह, स्टुडिओ आणि इतर पायाभूत सुविधा उपलब्ध आहे. स्मार्टद्वारे आता माध्यम क्षेत्रातील 'बी. व्होक (व्होकेशनल) मीडिया आणि एन्टरटेनमेंट’ हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तसेच ‘सर्टिफिकेट कोर्स इन मिडीया स्किल्स’ हा एक वर्षाचा अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थीनींना माध्यमे आणि ह्युमानिटीज, कॅमेरा, अँकरिंग, साउंड, रेडिओ, पोस्ट-प्रॉडक्शन, माध्यम कायदा आणि नीतिशास्त्र अशा विविध गोष्टी शिकवल्या जातील.
कौशल्याधारित शिक्षण
स्मार्टच्या संचालिका राधिका इंगळे यांनी सांगितले की, मुलींना केंद्रस्थानी ठेवून अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. कौशल्याधारित शिक्षण हे उद्दिष्ट ठेवून या अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत माध्यामात कंटेट रायटिंग सारख्या कामात मुलींचा अधिक सहभाग आहे. मात्र व्हिडिओ तंत्रज्ञान, साउंड इंजिनिअरींग, प्रोडक्शन अशा तंत्रज्ञानावर आधारित क्षेत्रांमध्येही मुलींचा सहभाग वाढावा यावर अभ्यासाक्रमात भर दिला जाणार आहे. अभ्यासक्रमासाठी शुल्क अतिशय किफायतशीर असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे. अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती www.schoolofmediaart.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.