आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थी संतप्त:MPSC परीक्षा पुढे ढकलण्यावरून संतप्त विद्यार्थी रस्त्यावर; पडळकर म्हणाले- पीपीई कीट देऊन परीक्षा घ्या; तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला विरोध

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यातील नवीपेठ परिसरात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन - Divya Marathi
पुण्यातील नवीपेठ परिसरात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलली आहे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या 14 मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयाविरोधात एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक झाले असून, पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शहरातील नवी पेठ, शास्त्री रोड परिसरात ठिय्या आंदोलन केले आहे. परीक्षा रद्द केली जाऊ नये अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. यावेळी विद्यार्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे. यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांची समजूत काढण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पुण्यासोबतच नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूरातही विद्यार्थ्यांनी या निर्णयाविरोधात आंदोलन केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा घेण्याची मागणी केली.

पुण्यातील नवी पेठ भागात विद्यार्थ्यांचे आंदोलन
पुण्यातील नवी पेठ भागात विद्यार्थ्यांचे आंदोलन

राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्शवभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. या निर्णयानंतर मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पोलिस त्यांना तेथून हटवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण विद्यार्थी मागे हटायला तयार नाहीत. राज्यसेवा पूर्ण परीक्षा आतापर्यंत पाच वेळा पुढे ढकलण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

भाजप आमदार गोपीचंद पडळकर रस्त्यावर झोपले

यावेळी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर झोपून राज्य सरकारचा निषेध केला. गोपीचंद पडळकरांमुळे आंदोलन विद्यार्थ्यांनाही चांगलेच स्फुरण चढले. गोपीचंद पडळकर रस्त्यावर आडवे पडून सरकारविरोधात घोषणबाजी करत आहेत. जोपर्यंत सरकार परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असे पडळकर म्हणाले. पुण्यात राहण्याचा खर्च खूप लागतो. यामुळे आता पुन्हा ही परीक्षा पुढे ढकलल्यास ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होईल, असेही पडळकर म्हणाले.

‘पीपीई कीट घालून परीक्षा घ्या’

आतापर्यंत UPSC, बँकिंग आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया पार पडली. मग कुणाचीही मागणी नसताना राज्य सरकार एमपीएससीची परीक्षा पुढे का ढकलत आहे, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला. भले विद्यार्थ्यांना पीपीई किट घालायला लागली तरी चालतील पण MPSC ची परीक्षा 14 तारखेला झालीच पाहिजे. हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, असेही पडळकर म्हणाले.

निर्णय तत्काळ स्थगित करावा- देवेंद्र फडणवीस

याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्विट केले की, एमपीएससीच्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यामुळे वर्षानुवर्षे त्यासाठी तयारी करणार्‍या असंख्य विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होते आहे. त्यामुळे परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा.

नोकऱ्यांची वयोमर्यादा 2 वर्षे वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा- चंद्रकांत पाटील

MPSC परीक्षा पुढे ढकलणे हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अन्यायकारक आहे. या सरकार मध्ये जरा देखील समन्वय आढळून येत नाही त्यामुळेच ही गोंधळाची परिस्थिती उद्भवली आहे. प्रत्येक विद्यार्थी या परीक्षेसाठी 2 ते 3 वर्ष प्रयत्न करत असतो.त्याच्यामागे अनेक वर्षांची मेहनत आणि कष्ट असतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरणे स्वाभाविक आहे. MPSC सरकारी नोकऱ्यांची वयोमर्यादा 2 वर्षाने वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा, अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

औरंगाबादमध्येही विद्यार्थी निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले
औरंगाबादमध्येही विद्यार्थी निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले

परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय चुकीचा - पंकजा मुंडे

एमपीएससीची परीक्षा ढकलण्याचा निर्णय चुकीचा असल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. त्यांनी याबाबत ट्वीट करुन म्हटले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC रविवार दिनांक 14 मार्च, 2021 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 ही अचानक पुढे ढकलण्यात आली आहे, हा चुकीचा निर्णय घेतला गेला आहे, त्यामुळे परीक्षार्थींचे नुकसान होणार असल्याने त्याला नापसंती व्यक्त करत आहे.

परीक्षांबाबत सरकारने नियोजन केले नाही- प्रविण दरेकर

यावेळी भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर म्हणाले की, राज्य सरकार म्हणते की कोरोना काळात महाराष्ट्र काही थांबला नाही. हे केवळ बोलून चालत नाही तसे करावे लागते. कोरोना काळात नियोजन करावे लागते. एमपीएससीच्या परीक्षांबाबत राज्य सरकारने काही नियोजन केले नाही. केवळ कोरोनाचे कारण दाखवून परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत.

परीक्षा झालीच पाहिजे- रोहित पवार

याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरद्वारे ते म्हणाले की, 'यापुढे कोरोनामुळे कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढे जावे लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच एमपीएससीची परीक्षा झाली पाहिजे.' तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याकडे लक्ष देण्याची विनंती केली.

अचानक घेण्यात आलेला निर्णय चुकीचा- पृथ्वीराज चव्हाण

याबाबत बोलताना काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कोरोना आहे पण कोरोनाच्या काळात इतर परीक्षा सुद्धा होत आहेत. यूपीएससी आणि आरोग्य खात्यासह इतर परीक्षा झाल्या. मोठ्या राजकीय नेत्यांचे मोठे-मोठे कार्यक्रम होत आहेत. अशात फक्त विद्यार्थ्यांना शिक्षा देणे कारण, ते काही करू शकत नाहीत हे योग्य नाही. अचानक घेण्यात आलेला हा निर्णय चुकीचा निर्णय आहे.

काँग्रेस नेत्याकडून सरकारला निर्णय मागे घेण्याचे आवाहन

काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला त्याचा निषेध करतो, असेसत्यजीत तांबेंनी म्हटले आहे. तसेच, त्या निर्णयावर तातडीने फेरविचार करा, असे आवाहन तांबे यांनी केले आहे.

14 मार्च रोजी होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSC ची नियोजित परीक्षा स्थगित करण्यात आली. आयोगाने त्या संबंधीची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे गुरुवारी जारी केली आहे. आयोगाने दिलेल्या पत्रात म्हटले की, राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणूनच वेगवेगळ्या जिल्हयांनी निर्बंध लावलेले आहेत. प्रस्तुत परीक्षेची सुधारित तारीख जाहिर करण्यात येईल असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव यांनी परिपत्रकात म्हटले आहे. या परीक्षेसाठी औरंगाबाद शहरातील 59 केंद्रावर 19 हजार 656 उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापूर्वी देखील परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. यामुळे पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेतील करिअर करु पाहणाऱ्या उमेदवारांना परीक्षेसाठी वाट पहावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...