आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकलाकाराच्या कलाकृतीला प्रोत्साहन व त्याला योग्य मोबदला मिळाला, तर तो आणखी चांगली निर्मिती करू शकतो. महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांना अप्रेंटिस किंवा मानधन तत्वावर प्रात्यक्षिक अनुभव घेण्याची संधी द्यायला हवी. विद्यार्थ्यांनी भवताल समजून घेत नाविन्यपूर्ण, कलात्मक व शाश्वत विकासाच्या कल्पनांवर काम करावे असे मत राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांतील कलागुणांना वाव मिळावा व वर्षभर त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक व्हावे, यासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशन संचालित पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड टेक्नॉलॉजीतर्फे आयोजित 'ऑरा 2023' सजावट प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी शेखर गायकवाड बोलत होते. प्रदर्शनाचे हे 17 वे वर्ष असून, यंदा 'शाश्वत विकासाची 17 ध्येये' संकल्पनेवर हे प्रदर्शन होत आहे. टाकाऊ वस्तूंपासून या सगळ्या गोष्टी साकारण्यात आल्या आहेत, हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.
प्रसंगी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे उपसचिव मोहम्मद शाहिद उस्मानी, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुभाष पवार, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, उद्योजक कल्याण तावरे, अध्यात्मिक समुपदेशक विद्यावाचस्पती विद्यानंद, 'पीआयएटी'चे प्राचार्य प्रा. अजित शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. गायकवाड यांनी 'सूर्यदत्त'मधील विद्यार्थ्यांना साखर संकुलात उभारण्यात येत असलेल्या संग्रहालयाच्या कामात सहभागी करून घेणार असल्याचे सांगितले.
सदाशिव पेठेत असलेल्या 'पीआयएटी' संस्थेच्या परिसरात हे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांतर्गत केलेले काम, तसेच घर सजावटीसाठीच्या वस्तू, पायाभूत सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्लास्टिकमुक्त परिसर, सुंदर शहर, हरित शहर, ऊर्जेचे पर्याय, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध गोष्टी शिल्प आणि हस्तकलेच्या माध्यमातून चिथारल्या आहेत.
शेखर गायकवाड म्हणाले, कला क्षेत्राबद्दल समाजात म्हणावी, तशी जाणीव निर्माण झालेली नाही. कलेला वाव, पाठबळ दिले पाहिजे. कौशल्य विकास कार्यक्रमात अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांना समाविष्ट करायला हवे. कल्पकतेला पैसे द्यावे, ही भावना रुजायला हवी. विद्यार्थ्यांना शिक्षण सुरु असतानाच कमावण्याची सवय लावणे गरजेचे आहे. तसेच एखाद्या क्षेत्रात करिअर करताना आपला बी प्लॅन तयार ठेवायला हवा.
मोहम्मद शाहिद उस्मानी म्हणाले, हा अभ्यासक्रम शिकताना तांत्रिक बाबी पक्क्या होण्यावर भर दिला पाहिजे. समाजाला नेमके काय हवे, याचा विचार करून आपल्याला नाविन्यपूर्ण, कल्पक रचना निर्माण करता याव्यात. अभ्यासक्रम यासोबतच प्रात्यक्षिक अनुभव घेण्याला प्राधान्य द्यावे. गटागटाने कंसल्टंसी सुरु करून त्यातून अर्थार्जन करता येऊ शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.