आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकऱ्यांना कृषी अवजारांच्या खरेदीसाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनाअंतर्गत पुणे जिल्हयातील 13 तालुक्यांमध्ये 6 हजार 134 लाभार्थ्यांना 34 कोटी 77 लाख 33 हजार रुपये इतकी अनुदान रक्कम वितरीत करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुभाष काटकर यांनी दिली आहे.
कृषी विकास योजना
राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत कृषि यांत्रिकीकरण, कृषि यांत्रिकीकरण उप अभियान आणि राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनाअंतर्गत त्या त्या बाबीमध्ये समाविष्ट यांत्रिक अवजारांच्या खरेदीसाठी अनुदान स्वरुपात अर्थसहाय्य थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा केले जाते.
6 हजार 134 लाभार्थी
जिल्ह्यामध्ये कृषि यांत्रिकीकरणाअंतर्गत संगणकीय सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड झाली आहे. त्यापैकी आवश्यक अटींची पूर्तता केलेल्या ६ हजार १३४ लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान रक्कम वर्ग करण्यात आली आहे.
ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्र व अवजारे, ट्रॅक्टर व पॉवर टिलर चलित अवजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैल चलित अवजारे, प्रक्रिया युनिट्स, भाडे तत्वावर कृषि व औजारे सेवा पुरवठा केंद्रांची उभारणी (सीएचसी) अवजारे बँक आदी बाबी कृषि यांत्रिकीकरणाअंतर्गत अनुदानासाठी समाविष्ट आहेत.
पात्र शेतकऱ्यांची निवड
कृषि विभागाच्या योजनांची ‘महाडीबीटी पोर्टल’द्वारे अंमलबजावणी केली जात असून शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबीच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. या बाबी शेतकऱ्यांना ज्या योजनेतून देता येऊ शकतील त्या योजनांतर्गत पात्र शेतकऱ्यांची संगणकीय सोडत पद्धतीने निवड केली जाते. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता व सुसूत्रता येऊन वरिष्ठ पातळीवरुन प्रभावी संनियंत्रण शक्य झाले आहे.
तालुकानिहाय लाभार्थी व वर्ग केलेले अनुदान पुढीलप्रमाणे-
तालुका | लाभार्थी | अनुदान |
आंबेगाव | ४९४ | २ कोटी ७१ लाख ३६ हजार रुपये |
बारामती | ८२१ | ४ कोटी ६७ लाख ७८ हजार रुपये |
भोर | ३४५ | २ कोटी ४० लाख २० हजार रुपये |
दौंड | ७९९ | ४ कोटी १० लाख १९ हजार रुपये |
हवेली | २३९ | १ कोटी २५ लाख ६३ हजार रुपये |
इंदापूर | ७८२ | ४ कोटी ७० लाख ४८ हजार रुपये |
जुन्नर | ५२२ | ३ कोटी 3 लाख ११ हजार रुपये |
खेड | ३९४ | २ कोटी ३३ लाख ५ हजार रुपये |
मावळ | ६१ | ५९ लाख ६९ हजार रुपये |
मुळशी | ८९ | ९५ लाख ३८ हजार रुपये |
पुरंदर | ६१२ | २ कोटी ६४ लाख ६३ हजार रुपये |
शिरुर | ८८८ | ४ कोटी ८७ लाख ७० हजार रुपये |
वेल्हे | ८८ | ४८ लाख ६ हजार रुपये |
इतके अनुदान वर्ग केले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुभाष काटकर यांनी दिली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.