आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्याच्या वर्षीचा साखरेचा गाळप हंगाम संपुष्टात येत असून मागील वर्षीच्या गाळप हंगामाचा तुलनात्मक अभ्यास केला असता, यंदा साखरेचे उत्पादन कमी झाल्याचे दिसून येत आहे. चालू हंगामात राज्यभरात आत्तापर्यंत १०१९.३० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून १०४८.८२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यभरातील २०४ साखर कारखान्यांचे गाळप बंद झाले असून सोलापूर ,जालना, उस्मानाबाद ,बीड आणि सातारा येथील सहा साखर कारखान्याचे गाळप अद्याप सुरू आहे अशी माहिती साखर आयुक्तलय यांनी मंगळवारी दिली आहे.
साखर आयुक्तालयातील सहसंचालक पांडुरंग शेळके यांनी सांगितले की, पावसाचा लहरीपणा, अतिवृष्टी ,काही ठिकाणी पावसाचे अत्यल्प प्रमाण, तर काही भागात कमी कालावधीत अधिक पाऊस आदी बदलांमुळे यंदा उत्पादकतेचे प्रमाण कमी झाले आहे. मागील वर्षी राज्यात सहकारी आणि खाजगी क्षेत्रातील १९९ कारखाने कार्यरत होते. मात्र, यंदा हे प्रमाण २१० सहकारी व खाजगी साखर कारखान्यापर्यंत पोहोचले आहे. यंदा गाळप क्षमता वाढली असली तरी उत्पादकता कमी दिसून येत आहे. साखर कारखान्यांची दै. गाळप क्षमता ८८४९५० मे. टन इतकी राहिलेली आहे. हेच प्रमाण मागील वर्षी ८२८६५० मे. टन.पर्यंत मर्यादित होते. यंदाच्या वर्षी खोडवा जास्त राहिल्यामुळे नवीन ऊस लागवडीचे प्रमाण राज्यात कमी राहिले आहे. तसेच पावसाच्या बदलत्या स्वरूपामुळे शेतकऱ्यांना अंतर्गत मशागत करता आली नाही, त्यामुळे ही उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. गाळप क्षमता वाढल्याने बारा महिन्याचा ऊस तोडणी न होता लवकर ऊस तोडणी झाल्याने साखरेचा उताराही कमी राहिलेला आहे. मागील हंगामात साखरेचा उतारा १०.४२ टक्के होता मात्र यंदा तो ९.९८ टक्कया पर्यंत कमी आला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.