आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Suicide Of 7 Members Of The Family, Husband And Wife From Beed And Family Of The Girl From Osmanabad | Pune Crime News| Pune News

खळबळजनक प्रकार:कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या, पती-पत्नी बीडचे तर मुलीचे कुटुंबीय उस्मानाबादचे

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या मुलाने एका विवाहित महिलेस लग्नासाठी पळवल्याच्या रागातून शेतमजूर पित्याने पत्नी, मुलगी, जावई व तीन नातवंडांसह आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार पुण्यात उघडकीस आला. हे कुटुंब मूळचे बीड जिल्ह्याचे रहिवासी आहे. पोलिसांनी दाैंड तालुक्यात पारगाव येथे भीमा नदीपात्रातून बुधवारपासून ७ दिवसांत ७ मृतदेह बाहेर काढले. विवाहित महिलेस पळवून नेल्याने समाजात बदनामी होईल या भीतीपोटी पित्याने कुटुंबासह आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. मृतांमध्ये कुुटंुबप्रमुख माेहन उत्तम पवार (५०), संगीता माेहन पवार (४५, दाेघे मु.रा.खामगाव, गेवराई, जि.बीड), मुलगी राणी शामराव फुलवरे (२७), जावई शामराव पंडित फुलवरे (३२), नातवंडे रितेश शामराव फुलवरे (७), छाेटू शामराव फुलवरे (५) व कृष्णा फुलवरे (३) अशा ७ जणांचा समावेश आहे. मुलगी-जावई हे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्याच्या हाताेला गावचे रहिवासी आहेत

१७ जानेवारी रात्रीपासून बेपत्ता
पोलिसांनुसार, ऊसतोड कामगार पवार कुटुंबीय वर्षापूर्वी दौंड परिसरातील पारगाव हद्दीतील निघोज (ता. पारनेर, जि.नगर ) येथे वास्तव्यासाठी आले. धाकटा मुलगा अनिलचे (२०) पतीपासून विभक्त राहत असलेल्या विवाहितेवर प्रेम होते. त्याने तिला १७ जानेवारीला पळवून नेले. त्यानंतर मोहन पवार यांनी कुटुंबापासून स्वतंत्र राहणारा मोठा मुलगा राहुल पवार यास फोन केला. तुझ्या धाकट्या भावाने वडार समाजाची मुलगी पळवून नेली. तिला परत आणण्यास सांग, अन्यथा विष पिऊन कुटंुबासह आत्महत्या करेन, असे सांगितले. त्यानंतर रात्री हे कुटुंब बेपत्ता झाले.

महिलेच्या मृतदेहाजवळील मोबाइलमुळे झाला उलगडा
शेतमजूर पित्याने पत्नी, मुलगी, जावई आणि तीन नातवंडांसह आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार पुण्यात उघडकीस आला. १८ जानेवारी रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास काही मच्छीमारांना नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह आढळला. त्यानंतर २०, २१ आणि २२ जानेवारी रोजी आणखी तीन मृतदेह आढळले. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्याच वेळी आणखी मृतदेह असू शकतात, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या बचाव पथकाची मदत घेऊन शोधकार्य सुरू केले. दोन दिवसांच्या शोधानंतर सोमवारी बचाव पथकाला आणखी ३ लहान मुलांचे मृतदेह नदीत आढळले.

बदनामीच्या भीतीने आत्महत्या : तीन वर्षांचा एक मुलगा असलेल्या व पतीपासून विभक्त राहत असलेल्या विवाहितेस पळवून नेल्याने समाजात बदनामी होईल व कुटुंबाची प्रतिष्ठा लयास जाईल म्हणून मोहन पवार यांनी कुटुंबासह आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. चार मृतदेहाचे शवविच्छेदन झाले असून पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. मृतदेहांच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत. परंतु मुलगी, जावई, नातवंडांसह आत्महत्या का केली याचा उलगडा होत नसल्याने त्यामागे काही घातपाताचा प्रकार आहे का, या दिशेनेही पोलिस तपास सुरू आहे. पोलिसांनी थोरला मुलगा राहुल याचीही चाैकशी सुरू केली आहे.

मुलाची केली चौकशी
एकापाठोपाठ मृतदेह सापडत असल्याने पोलिसांनी कसून तपास सुरू केला. २० जानेवारी रोजी सापडलेल्या एका महिलेच्या मृतदेहाजवळ मोबाइल आढळला. त्यावरुन नातेवाइकांचा शोध सुरू केला. तेव्हा मोठ्या मुलाचा शोध लागल्यानंतर त्याची चौकशी सुरू केल्यावर खरा प्रकार समोर आला. ७ मृतदेह आढल्याचे कळताच ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी घटनास्थळी भेट दिली.

बातम्या आणखी आहेत...