आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रिया सुळेंची जोरदार टोलेबाजी:नेत्यांचे फोन नॉट रिचेबल, घरात जेवढी बायको फुगत नसेल तेवढे हे मंत्री फुगतात

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरात जेवढी बायको फुगत नसेल तेवढे हे मंत्री फुगतात. दिल्लीवाले मला विचारत होते की तुमच्याकडे मोबाईल नॉट रिचेबल आहेत, हे काय नवीन सुरू आहे, कुठला नेता असा असू शकतो जो नॉट रिचेबल नसेल? नेता हा 24 तास कामासाठी रिचेबल असला पाहिजे, तो उपलब्ध नसेल तर उपयोग काय? असा सवाल करत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी नव्या सरकारला टोला लगावला. महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणाऱ्या गोष्टी सध्या सुरू आहेत. त्यामुळे एखाद्या संघटनेचे नाव खराब होते असे नाही तर महाराष्ट्राचे नाव खराब होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सत्ता येते आणि जाते आपण लोकांसाठी काम करत राहायचे, जनतेची सेवा करणे महत्त्वाचे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी पाऊस असतानाही मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले, लहान मुले पण आजच्या पदयात्रेत सहभागी झाली, त्या सगळ्यांचे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले.

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी व त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसह अनेकांनी योगदान दिले. त्यांच्यामुळे आज आपण हा मोकळा श्वास घेऊ शकतो. इतिहासात अनेक नावं नोंदलेली आहेत. पण असंख्य कुटुंबं अशी आहेत ज्यांची नोंदच नसेल. ज्यांचं नाव कदाचित कुठल्याही इतिहासाच्या पुस्तकात नसेल. पण आपल्या मनाच्या इतिहासात देशातील ज्या ज्या व्यक्तीने, महिला असू दे वा पुरुष ज्यांनी मोठा त्याग आपल्यासाठी केला त्यांच्यासमोर नतमस्तक होऊया. या ज्ञात-अज्ञात सर्व व्यक्तींना आपण नमन केले पाहिजे, आभार मानले पाहिजेत, असे सुप्रिया म्हणाल्या.

संविधानासमोर नतमस्तक

पुढे त्या म्हणाल्या की, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचे आधुनिक भारताचे स्वप्न पाहिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिले. ज्याद्वारे आपल्याला मताचा अधिकार मिळाला, स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला, ज्या चौकटीत आपला देश आज 75 वर्षे चालला आहे. त्या संविधानासमोर आज आपण नतमस्तक व्हायला हवे.

देशाचे पुढील सगळे काम महिलांच्या समतेच्या अधिकारांचे पालन करून होईल, या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचे त्यांनी स्वागत केले. महाराष्ट्र राज्याने सर्वप्रथम महिलांना आरक्षण दिले, महिला समानतेचे ब्रीद धरून त्यांना निर्णय प्रक्रियेत आणले. शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेण्यात आला. आज प्रधानमंत्री जे बोलत आहेत त्या निर्णयाचे बीज याच महाराष्ट्रात रोवण्यात आले, याचा अभिमान सुप्रिया यांनी व्यक्त केला.

ही माहिती प्रधानमंत्र्यांना पाठवावी

महाराष्ट्रात महिला धोरणाबाबत किती काम झाले आहे याची सगळी माहिती पंतप्रधानांना दिली पाहिजे असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण यांनी विनंती केली की, देशातील पहिले महिला धोरण व त्याविषयी महाराष्ट्रात झालेले काम याची माहिती प्रधानमंत्र्यांना पाठवावी तसेच शाहू, फुले, आंबेडकर,सावित्रीबाईंचा विचार सगळीकडे पोहोचवावा. आज पंतप्रधानांनी केलेल्या भाषणात शिक्षणाला प्राधान्य, महिला धोरण, विज्ञान क्षेत्राची वाढ, तंत्रज्ञान विकास, श्रद्धा व अंधश्रद्धांबाबत डोळस भूमिका यांचा उल्लेख झाला, या गोष्टींची सुरूवात महाराष्ट्रात झाली याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्याचे काम फोन व व्हिडिओद्वारे दिसते
हा सगळा विचारांचा वारसा हा फक्त महाराष्ट्राचा वारसा नाही तर हा देशाचा वारसा आहे. आज संसदेत शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे पुतळे आहेत. त्यांचा उल्लेख पंतप्रधानांनी भाषणात केला. म्हणजेच त्यांनी आज केलेले भाषण हे महाराष्ट्राचं कौतुक होतं. स्व. यशवंतराव चव्हाण ते उद्धव ठाकरेंपर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, आपल्या मराठी माणसांनी जे काम केले ते मराठी माणसांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे सुप्रिया म्हणाल्या. तसेच नंतरच्या मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊ शकत नाही कारण त्यांचे अजून सरकारच स्थिरस्थावर नाही, ते अजून कामाला लागलेच नाहीत, त्यांचे काम फोन व व्हीडिओद्वारे दिसते असा टोलाही त्यांनी लगावला.

काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे आभार

‘मेरा भारत महान’ आहेच, पण ज्या महाराष्ट्राच्या मातीशी आपले नाते आहे. त्याचा ओलेपणा आणि त्या मातीचे कष्ट आपल्याला विसरून चालणार नाहीत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेकांनी योगदान दिलं, खूप पिढ्यांनी महाराष्ट्रासाठी संघर्ष केला, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी सहकार्य केले त्यांचेही स्मरण करायला हवे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. आज राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. पदयात्रा करत आहे. प्रत्येकाला आपण भारतीय असल्याचा अभिमान आहे. भारताच्या जडणघडणीत, निर्णय प्रक्रियेत गेली २३ वर्षे तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांमुळे अगदी शेवटच्या माणसाची सेवा करण्यात आपल्याला यश आले. तुमच्या आशीर्वादामुळे, विश्वासामुळे हा पक्ष उभा आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.

कर्तृत्व हे कृतीतून येते
राष्ट्रवादी काँग्रसेमध्ये अजित, जयंतराव, भुजबळ यांच्यासह प्रत्येक नेत्याचे जनता दरबार सर्वसामान्य माणसाने जवळून पाहिले. सामान्य माणूस नेत्याला भेटून, आपले काम करून, आनंदाने आपला प्रश्न सोडवून घरी जातो, हे महत्त्वाचे आहे. सत्ता ही सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठीचे साधन आहे. देशभरात मुख्यमंत्री बरेच झाले पण अशी किती लोकांची नावं आज आपल्या लक्षात आहेत? सध्या कोणाकडे कुठले खाते आहे हे टीव्ही सांगतो म्हणून म्हणायचे. कर्तृत्व हे पदातून येत नाही तर ते कृतीतून येते. अशी कृती असंख्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून दिसत असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...